Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 04:05 PM2024-11-23T16:05:54+5:302024-11-23T16:07:48+5:30
Maharashtra Assembly Election Result 2024: लव्हेकर दहा वर्षे येथे आमदार होत्या. महाविकास आघाडीनं येथून शिवसेनेच्या उबाठा गटाच्या हारून खान यांना तिकीट दिलं होतं.
Maharashtra Assembly Election Result 2024: महाराष्ट्रातील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान झालं. महायुतीनं सलग दोन वेळा विजयी झालेल्या भाजपच्या भारती लव्हेकर यांना उमेदवारी दिली. भारती लव्हेकर यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. लव्हेकर दहा वर्षे येथे आमदार होत्या. महाविकास आघाडीनं येथून शिवसेनेच्या उबाठा गटाच्या हारून खान यांना तिकीट दिलं होतं. दरम्यान, त्यांनी भारती लव्हेकर यांचा १६०० मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली होती.
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या भारती लव्हेकर यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार बलदेव खोसा यांचा पराभव केला होता. लव्हेकर यांनी पहिल्या निवडणुकीत २६ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पुन्हा एकदा बलदेव खोसा यांच्याशी सामना झाला, मात्र दुसऱ्यांदा कमी मतांनी विजयी झाल्या. यावेळी हारून खान आणि त्यांच्यात कडवी लढत झाली. मात्र, यावेळी हारून खान यांनी बाजी मारली.
२००८ च्या परिसीमनानंतर वर्सोव्याचा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं या ठिकाणी विजय मिळवला होता. बलदेव खोसा यांनी शिवसेनेचे उमेदवार यशोधर फणसे यांचा १२ हजार ३० मतांनी पराभव केला. या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे चंगेज मुलतानी यांना १० हजारांहून अधिक मतं मिळाली होती. मनसेच्या उमेदवाराला ९ हजार ६५९ मते मिळाली होती.