हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 01:27 PM2024-11-23T13:27:48+5:302024-11-23T13:28:56+5:30
Maharashtra Assembly Election Result 2024: बोरिवली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील व्हीआयपी मतदारसंघांपैकी एक मानला जातो. या मतदार संघात संजय उपाध्याय यांनी मोठा विजय मिळवलाय.
Maharashtra Assembly Election Result 2024: बोरिवली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील व्हीआयपी मतदारसंघांपैकी एक मानला जातो. फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वाहतूक, पार्किंग, आरोग्य सुविधांचा अभाव असे प्रश्न दरवर्षी निवडणुकीत उपस्थित होतात. भाजपनं तिकीट कापल्यानंतर गोपाळ शेट्टी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे येथील लढत चुरशीची झाली होती. मात्र त्यांनी अखेरच्या क्षणी आपलं नाव मागे घेतलं. यानंतर भाजपचे संजय उपाध्याय आणि शिवसेना उबाठाचे संजय भोसले या दोन उमेदवारांमध्ये लढत झाली. यामध्ये भाजपच्या संजय उपाध्याय यांचा विजय जवळपास निश्चित झालाय.
गोपाळ शेट्टींनी अडकवलेला पेच
बोरिवली विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी यापूर्वीही भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला होता. मात्र, यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टी यांना तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या ठिकाणी राजकारणानं वेगळंच वळण घेतलं होतं.
मात्र, गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या अनेक दिग्गजांनी प्रयत्न केले होते आणि अनेक प्रयत्नांनंतर त्यांनी होकार दिला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गोपाळ शेट्टी यांनी अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांचा मार्ग मोकळा झाला होता. २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्याच सुनील राणे यांनी मोठ्या फरकानं विजय मिळवला होता. तर २०१४ च्या निवडणुकीत या ठिकाणाहून विनोद तावडेंनी विजय मिळवला होता.
कोण आहेत संजय उपाध्याय?
संजय उपाध्याय हे भाजप महाराष्ट्रचे सचिव आहेत. त्यांचे वडील एस. रामभक्त भगवतीप्रसाद उपाध्याय हे दीर्घकाळ संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनीच संजय उपाध्याय यांना राजकारणात आणलं. संजय उपाध्याय वयाच्या सहाव्या वर्षापासून वडिलांसोबत संघाच्या शाखांशी जोडले गेले होते. संजय उपाध्याय यांचं शालेय शिक्षणही मुंबईत झालं.