Maharashtra Assembly Election Result 2024: दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 05:02 PM2024-11-23T17:02:39+5:302024-11-23T17:03:24+5:30
Maharashtra Assembly Election Result 2024: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारा दहिसर विधानसभा मतदारसंघ गेल्या दहा वर्षांपासून भाजपकडे आहे. यावेळीही भाजपनं आपला गड राखला आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारा दहिसर विधानसभा मतदारसंघ गेल्या दहा वर्षांपासून भाजपकडे आहे. २०१४ मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली. याचा फायदा भाजपला दहिसरमध्ये मिळाला. ही जागा शिवसेनेच्या ताब्यात होती. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला येथे यश मिळालं होतं. सध्या या मतदारसंघात भाजपची चांगली पकड आहे. दहिसरमध्ये गेल्या दहा वर्षांत भाजपने आपली ताकद वाढवली आहे. दरम्यान, याचा फायदा भाजपच्या मनीषा चौधरी यांना झाला असून त्यांनी विजयची हॅटट्रिक मारली आहे. यात विनोद घोसाळकर यांचा त्यांनी ४४,३२९ मतांनी पराभव केला.
२००९ मध्ये शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर दहिसरमधून विजयी झाले होते. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे घोसाळकर यांना त्या निवडणुकीत ६० हजार मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेसच्या योगेश दुबे यांचा १६ हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत मनसेच्या दीपा पाटील यांना २२ हजार मते मिळाली. त्यामुळे घोसाळकर यांच्या मतांची टक्केवारी कमी झाली.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना-भाजप युती तुटली. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही स्वबळावर निवडणूक लढवली. सर्वच पक्ष स्वबळावर लढले असल्याने मोठा फरक पडला. मोदी लाटेचा फायदा भाजपला झाला. मनीषा चौधरी यांनी शिवसेनेच्या घोसाळकर यांचा ३८ हजार ५७८ मतांनी पराभव केला.
२०१९ च्या शिवसेना-भाजप युतीत दहिसरची जागा भाजपच्या खात्यात गेली. भाजपने विद्यमान आमदार मनीषा चौधरी यांना संधी दिली. त्यांनी काँग्रेसच्या अरुण सावंत यांचा सुमारे ६४ हजार मतांनी पराभव केला.