महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
By दीपक भातुसे | Published: September 23, 2024 10:26 AM2024-09-23T10:26:05+5:302024-09-23T10:26:30+5:30
विदर्भात काँग्रेसला ४५ जागा गेल्या तर उर्वरित १७ जागा उद्धवसेना व शरद पवार गटात कशा वाटणार, असा प्रश्न आहे.
मुंबईः विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत आतापर्यंत निम्म्यापेक्षा जास्त जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. मागील तीन दिवस मविआची विभागनिहाय चर्चा सुरू होती. यात मुंबई आणि विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि उद्धवसेनेत पेच निर्माण झाला आहे. मुंबईत उद्धवसेनेने २२ जागांवर दावा केला असून त्यातील काही जागा काँग्रेसच्या ताब्यातील आहेत. विदर्भात काँग्रेसला ४५ जागा हव्या आहेत. विदर्भात काँग्रेस जास्त जागा लढली तर सत्तेचा मार्ग सोपा होईल, असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. रामटेक, वाशिम, अमरावती, अकोला येथील जागांवर उद्धवसेनेने दावा केला आहे. विदर्भात काँग्रेसला ४५ जागा गेल्या तर उर्वरित १७ जागा उद्धवसेना व शरद पवार गटात कशा वाटणार, असा प्रश्न आहे.
१६० जागांचे वाटप पूर्ण; उर्वरित जागांवर कसोटी
मविआत मागील तीन दिवस विभागनिहाय जागा वाटपाची चर्चा झाली. यात विद्यमान आमदार असलेल्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहणार आहेत.
उर्वरित जागांचे वाटप सक्षम उमेदवार, पक्षाची त्या मतदारसंघातील ताकद आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर होणार आहे. या निकषावर
आतापर्यंत १६० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित १२८ जागांचे वाटप करताना मविआच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.
ज्या जागेवर दोन पक्ष दावा सांगत आहेत त्या जागेचा तिढा त्या दोन पक्षांनी आपसांत चर्चा करून सोडवायचा, असे मविआमध्ये ठरले आहे. त्यानुसार पुढे जागा वाटपाची चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
१६० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागा वाटप मेरीटवर करण्याचा आमचा तीनही पक्षांचा प्रयत्न आहे. तीनही पक्षात सकारात्मक चर्चा सुरू आहे. - विजय वडेट्टीवार, नेते, काँग्रेस
कोणी कितीही जागा मागू द्या. आम्ही तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतो. या निर्णयप्रक्रियेत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. संजय राऊत, नेते, उद्धवसेना