मुंबईः महाराष्ट्रातील निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. भाजपाला 105 जागा मिळाल्या असून, शिवसेना 56, काँग्रेस 52 आणि राष्ट्रवादी 54 जागांवर विजयी झाली आहे. अनेक ठिकाणी आघाडी आणि युतीच्या उमेदवारांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. तर काही ठिकाणी एकतर्फी लढत झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळालेलं मताधिक्यसुद्धा विचार करायला लावणार आहे. मुख्यमंत्र्यांचे विरोधक काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांना 58,774 मते मिळाली आहेत.तर फडणवीस यांना 1 लाख 8 हजार 256 मते मिळाली. राज्यात असेच काही मतदारसंघ आहेत, तिथे राजकीय नेत्यांनी मोठं मताधिक्य मिळवलं आहे. राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार हे पहिल्या स्थानी आहेत.
- राष्ट्रवादीचे नेते आणि बारामती मतदारसंघातील उमेदवार अजित पवार यांनी भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांचा लाजिरवाणा पराभव केला. पवारांनी पडळकर यांचा तब्बल 1 लाख 65 हजार 265 मताधिक्याने पराभव केला. अजित पवारांना 1 लाख 94 हजार 313 मतं मिळाली असून, पडळकरांचं डिपॉझिटचं जप्त झालं आहे.
- काँग्रेसचे पलूस-कडेगाव मतदारसंघातील उमेदवार विश्वजित कदमांचाही विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेच्या संजय विभुतेंना पराभवाची धूळ चारली. कदम यांनी विभुते यांचा जवळपास 1 लाख 62 हजार 521 मतांनी पराभव केला. कदम यांना 1 लाख 70 हजार 34 मतं मिळाली आहेत.
- भाजपाचे मुरबाड मतदारसंघातील उमेदवार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदूराव यांचा पराभव केला. कथोरे यांनी हिंदूराव यांचा जवळपास 1 लाख 35 हजार 40 मताधिक्याने पराभव केला. कथोरे यांना 1 लाख 74 हजार 68 मतं मिळाली.
- दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र काँग्रेसचे लातूर ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार धीरज देशमुख यांनी शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा पराभव केला आहे. धीरज देशमुख यांनी सचिन देशमुखांचा तब्बल 1 लाख 18 हजार 208 मताधिक्याने पराभव केला आहे. धीरज यांना 1 लाख 34 हजार 615 मतं मिळाली आहेत.
- काँग्रेसचे भोकर मतदारसंघातील उमेदवार अशोक चव्हाण यांनी भाजपाच्या बापूसाहेब गोरठेकर यांना पराभवाची धूळ चारली. चव्हाण यांनी सचिन गोरठेकरांचा 97 हजार 445 मताधिक्याने पराभव केला. धीरज यांना 1 लाख 39 हजार 737 मतं मिळाली.
- पनवेलमध्ये भाजपाच्या प्रशांत ठाकूर यांनी 92 हजार 730 इतक्या मताधिक्यानं शेकापच्या हरेश केणी यांना पराभूत केले.
- कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी 89 हजार 300 मतांच्या फरकाने विजय मिळवला असून, काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांचा पराभव केला आहे.
- रत्नागिरीत शिवसेनेच्या उदय सामंत यांनी 87 हजार 335 मतांच्या फरकाने राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांचा पराभव केला. सामंत यांना तब्बल 1 लाख 18 हजार 166 मताधिक्य मिळाली.