Maharashtra Budget Session 2024 ( Marathi News ) :मुंबई- महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीवरुन सभागृहात गोंधळ सुरू झाला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
"मनोज जरांगेंना अटक करा"; भाजपा आमदाराची विधानपरिषदेत मागणी
सभागृहात बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्र बेचिराख होण्याची भाषा मनोज जरांगे पाटील यांनी केली. या सगळ्या बाबतीत आतापर्यंत सरकारने घेतलेली भूमिका ही सर्वसमावेशक असली पाहिजे, अशी आमची सर्वांची मागणी आहे. पण, जरांगे यांच्या कालच्या भाषेवरुन मोठ्या कटाची परिस्थिती वाटते. या भयंकर कटाला दुर्लक्षित करुन चालणार नाही. महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा करणाऱ्यांना कोणही पाठिंबा देणार नाही. मराठा समाजाची आता बदनामी होते की काय याची आम्हाला भीती वाटतं आहे. मराठा समाजाचे आरक्षण आणि हीत जपले पाहिजे, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही हे प्रकरण गांभिर्याने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असंही आमदार शेलार म्हणाले.
" सुरुवातीपासून आपण त्यांची एक भूमिका मान्य केली. या आंदोलनकर्त्यांना बळ कोणी दिले? हा प्रश्न महत्वाचा आहे. हा घटनाक्रम बघितला तर सरळ नाही,आधी एका पक्षाचे प्रवक्ते असं बोलतात दुसऱ्याच दिवशी जरांगे तसेच बोलतात. जरांगे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होऊ देणार नाही म्हणाले. हे कोण आहेत. आता महाराष्ट्र बेचिराख करणार म्हणाले याची गंभीर दखल घेतली पाहिजे, अशी मागणीही आमदार शेलार यांनी केली. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जेसीबी आणि सगळी रसद जर राष्ट्रवादी एका पक्षाकडून आली असेल तर याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, असंही शेलार म्हणाले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी स्थापन करुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.