Maharashtra Assembly monsoon Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसताना दिसत आहेत. अधिवेशनादरम्यान एकमेकांवर चिखलफेक करणारे राजकारणी विधानभवनात एकमेकांशी अनपेक्षितपणे गप्पा मारताना दिसत असतात. काही दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला होता. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आता आमदार आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या लॉबीत भेट झाली.
विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळालं. विधिमंडळाच्या आवारात दोघेही समोर आले होते. यावेळी दोघांमध्ये छोटासा संवाद देखील झाला. एकीकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावरुन गोंधळ सुरु असतानाच आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अनपेक्षित भेट होऊन मिश्किल संवाद झाला.
काही दिवसांपूर्वी विधानभनवाच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच भेट झाली होती. त्यावरुन आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिश्किल टोला लगावला. विधिमंडळाच्या आवारात आदित्य ठाकरेंना पाहून देवेंद्र फडणवीसांनी नमस्कार काय चाललंय? असं विचारलं. त्यावर आदित्य ठाकरे यांनी मी लिफ्टमधून चाललोय, असे म्हटलं. आदित्य ठाकरेंच्या या विधानानंतर त्यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि आजूबाजूचे लोक खळखळून हसले.
दुसरीकडे, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवास केला होता. त्यावेळी लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये संवादही झाला होता. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मी आणि देवेंद्रजी यांच्यासोबतचा लिफ्ट प्रवास हा योगायोगचं आहे. लिफ्टला कान नसतात, त्यामुळे या पुढे गुप्त बैठक तिथेच करू, असे म्हटलं होतं.