'क' वर्गातील सर्व पद एमपीएससी मार्फत भरणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:58 PM2024-07-01T14:58:02+5:302024-07-01T15:00:23+5:30
Devendra fadnavis : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरती परिक्षांबाबत मोठी घोषणा केली.
Devendra fadnavis ( Marathi News ) : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज चौथा दिवस आहे. दरम्यान, 'क' वर्गातील सर्व पद एमपीएससी मार्फत भरणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्याच्या कॅबिनेट गट 'क'च्या जागा टप्प्या टप्प्याने एमपीएससीकडे वर्ग करणार आहोत.यासाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. लोकांची मागणी होती त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही तयारी दर्शवली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. गेल्या काही दिवसापासून परिक्षांच्या पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत. याबाबत आता राज्य सरकार गंभीर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
"फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार"; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजपासून नवीन कायदे सुरू झाले आहेत. आपण आतापर्यंत ब्रिटीशांनी केलेले कायदे वापरत होतो. आता भारताच्या संसदेने नवीन कायदे केले आहेत, ते आजपासून लागू होणार आहेत. राज्य सरकारने ७५ हजार पद भरण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पद भरली. पारदर्शी पद्धतीने परीक्षा पार पाडली. महाराष्ट्र सरकारने मोठी भरती केली. आतापर्यंत ५७ हजार ४५२ तरुणांना प्रत्यक्ष नियुक्ती पत्र आम्ही दिले आहे. आता ज्यांना नियुक्त पत्र देणार आहे अशांची संख्या १९ हजार आहेत, असंही फडणवीस म्हणाले.
"पारदर्शी पद्धतीने आम्ही परीक्षा घेतल्या आहेत. आता स्पर्धा परिक्षांबाबत गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्य सरकार नवीन कायदा करत आहे. याच अधिवेशनात हा कायदा करण्यात येणार आहे. वर्ग क ची पदही एमपीएससी मार्फत घेण्यात येणार आहेत. टप्प्या टप्प्याने या परीक्षा एमपीएससीला वर्ग करण्यात येणार आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार"
: लोकसभा निवडणुकीपासून राज्यात फेक नरेटिव्ह याचा अनेकदा उल्लेख करण्यात आला होता. राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही फेक नरेटिव्ह मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालं. पुण्यातील एक वेबसाईट राज्यात फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आमदार आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्या प्रश्नाना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान आहे.