Join us

'दिवा विझताना जास्त फडफडतो, तशी महायुती सरकारची अवस्था'; जयंत पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:47 PM

Jayant Patil : विधिमंडळाचे मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. काल अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Jayant Patil ( Marathi News ) : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. काल अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले, या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले. दरम्यान, काल झालेल्या खडाजंगीवरुन 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून रामनगरचं नाव बदलण्याची तयारी? भाजपा-जेडीएसकडून विरोध 

काल सभागृहात भाजपाचे आमदार अमित साटम यांनी मराठा आरक्षणाच्या बैठकीवरुन विरोधकांवर आरोप केले. मराठा आरक्षण आणि ओबीसी संदर्भात विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी सभागृहात दोन्ही गटाकडून गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, आता कालच्या गोंधळावरुन आमदार जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला खोचक टोला लगावला. 

विधानसभेत यांचा जनता पराभव  करणार

"दिवा विझताना जास्त फडफडतो तशी सध्या महायुती सरकारची अवस्था आहे. बादशाहाला वाटेल आणि बादशहाच्या मनात येईल त्यासारखे निर्णय घेतले जात आहेत. अतोनात पैसा खर्च केला जात आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. "बादशाहाच्या मनात आलं क्रिकेट विरांना खुश करण्यासाठी पैसे दिले. लोकसभेनंतर आता विधानसभेत या सर्वांचा पराभव जनता करणार आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. 

या सरकारला वेगळ्या ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडाव्या लागतात हे सरकारमध्ये गोंधळ असल्याचे पाहायला मिळत आहे.  समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड असे विविध रस्ते करताना ज्या ठिकाणी वीस रुपये खर्च अपेक्षित होता, अशा ठिकाणी शंभर रुपये खर्च केल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.  

जयंत पाटील म्हणाले, सरकार मुद्दाम सभागृह चालू देत नाही. काल आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनीच गोंधळ घातला आणि कामकाज बंद पाडलं. तुम्हाला जर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचं होतं तर मग कामकाज का बंद पाडलं, असा सवालही जयंत पाटील यांनी केला. 

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा