Join us

विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 6:17 PM

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज चौथा दिवस असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे, विधान परिषदेत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. 

'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. या मुद्द्यावरुन सभागृहात जोरदार वाद सुरू झाला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सभागृहात जोरदार गोंधळ सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.  

अंबादास दानवे सभागृहात काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या विधानावरुन विधान परिषदेत  चर्चा सुरू झाली होती. यावरुन भाजपा आमदार प्रसाद लाड विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे बोट करुन बोलत होते. यावेळी अंबादास दानवे जाग्यावरुन उठले आणि म्हणाले, सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे हे वक्तव्य ज्यांचं असेल त्याचं ते लोकसभेत झालेलं आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? असा सवालही दानवे यांनी केला. दानवे यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी गटातील आमदारांनी गोंधळ सुरू केला. यावेळी अंबादास दानवे यांचा तोल सुटल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. दानवे म्हणाले, माझा तोल सुटलेला नाही, मी शिवसैनिक आहे. माझ्यावर कोण बोट उचललं तर बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. जो या सभागृहाचा विषय नव्हता, सभापतींना बोलायला हवं होतं. माझ्याकडे बोट दाखवून, माझ्याकडे हातवारे करुन बोलायचा अधिकार नाही. मग माझा, आमदार विरोधी पक्षनेता नंतर सगळ्यात मी आधी शिवसैनिक आहे. हे आता मला हिंदुत्व शिकवणार का?, असंही अंबादास दानवे म्हणाले. 

यावर भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली. लाड म्हणाले, मी शिवी दिली नाही, ते माझ्या अंगावर आले. मी त्यांना सांगितलं तुम्ही असं बोललात तर आम्हीही तसंच बोलू. आम्ही त्यांच्यासोबत कुठेही बोलायला तयार आहे, असंही आमदार प्रसाद लाड म्हणाले.  

टॅग्स :विधानसभाअंबादास दानवेभाजपाशिवसेना