Join us  

'एनडी फिल्म स्टुडिओ सरकारने टेक ओव्हर करावा'; अशोक चव्हाण यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 12:38 PM

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (nitin chandrakant desai) यांच्या आत्महत्येमुळे कलाविश्वात एकच खळबळ माजली आहे.

मुंबई- प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (nitin chandrakant desai) यांच्या आत्महत्येमुळे कलाविश्वात एकच खळबळ माजली आहे. काल कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात आता विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी एनडी स्टुडिओ सरकारतर्फे टेकओव्हर करण्याची मागणी केली आहे. 

नितीन देसाई आत्महत्या: घटनास्थळावर आढळलं धनुष्यबाणाचं चिन्ह?; नेमका काय आहे अर्थ

आज अधिवेशनात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येसंदर्भात चर्चा सुरू होती. यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओ सरकारने टेक ओव्हर करावा अशी मागणी केली. आमदार अशोक चव्हाण म्हणाले, नितीन देसाई यांनी काल आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली. ही खूप वाईट बातमी आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये वेगळी छाप उमटवली. त्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये काही पुरावे दिले आहेत. त्यांच्यावर असलेल्या कर्जामुळे वसुलीसाठी त्यांच्यामागे लोक लागली होती, असं त्यात आहे. या सर्व गोष्टींचा चौकशी व्हायला पाहिजे, असंही चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाण पुढे म्हणाले, एनडी स्टुडिओ आहे तो शासनाने टेकओव्हर करावा. त्यावरती कर्ज आहे. इतर लोकांनी लिलाव लावण्यापेक्षा तो स्टुडिओ सरकारने घ्यायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीला उत्तर दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठी माणसाला अभिमान वाटावा असं देसाई यांनी काम केलं होतं. त्यांनी अनेक ठिकाणी मोठ मोठ्या प्रोजेक्टवर काम केलं. दिल्लीतील चित्ररथ तेच नेहमी करायचे. हरहुन्नरी कलावंत आपल्याला सोडून गेले आहेत. काही कर्ज त्यांच्यावर झाले होते ही गोष्टी खरी आहे. या संदर्भात आता चौकशी सुरू आहे. देसाई यांच्यावर कोणता दबाव होता का याची चौकशी करण्यात येईल. कायदेशीर बाबी तपासून नितीन चंद्रकांत देसाई यांची आठवण म्हणून हा आपल्याला तसाच ठेवून त्याचे संवर्धन करता येईल का या कायदेशीर बाबी तपासता येईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :अशोक चव्हाणनितीन चंद्रकांत देसाई