Maharashtra Political Crisis: आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपविल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याच्या कार्यवाहीला विलंब होत असल्याचा दावा ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत विधानसभा अध्यक्षांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. या सर्व घडामोडी घडत असताना एक महत्त्वाची अपडेट आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या ४० आमदारांना उत्तर देण्यास मुदतवाढ दिल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटांच्या आमदारांना नोटीस बजावत उत्तर देण्यास सांगितले होते. त्यानुसार काही आमदारांनी आपली बाजू मांडत नोटिसीला उत्तर दिले. मात्र, काही जणांनी या नोटिसीला उत्तर दिले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या ४० आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
अपात्रता प्रकरण आणखी लांबणीवर पडणार?
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सर्व आमदार हे अधिवेशनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचे समजते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे ही सुनावणी लांबण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आम्हाला दोन आठवड्याची मुदतवाढ दिलेली आहे. दोन आठवड्यात आम्ही आता उत्तर देणार आहोत, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले होते. हा अध्यक्षांचा अधिकार असल्याचे सांगत न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढण्यास सांगितले होते.