Rahul Narvekar Reaction on Supreme Court Issue Notice: आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपविल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य शिवसेना आमदारांविरोधात अपात्रतेच्या प्रलंबित नोटिसींवर तातडीने निर्णय घेण्याचा निर्देश द्यावेत, अशी मागणी करत ठाकरे गटाच्या वतीने या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावली असून, २ आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. या नोटिसीसंदर्भात राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
मीडिया रिपोर्टमधून मला समजले आहे की, सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावलेली आहे. मात्र, अद्याप माझ्याकडे कोणतीही याचिका किंवा नोटिसीची प्रत आलेली नाही. ती मिळाली की, त्याचा संपूर्ण अभ्यास करूनच मी पुढची भूमिका मांडेन, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
इतर कुणाचा विश्वास आहे की नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे
विधानसभा अध्यक्षांवर विश्वास नाही. त्यांच्याकडून न्याय मिळेल, याची अपेक्षा नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, सभागृहाचा विश्वास अध्यक्षांवर असणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्या व्यतिरिक्त इतर कुणाचा विश्वास आहे की नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्यासाठी, ज्या सभागृहाचे मी नेतृत्व करतो, सभागृहाचा अध्यक्ष म्हणून काम करतो, त्या सभागृहाचा विश्वास माझ्यावर असल्यामुळे मला इतर कोणत्याही टिपण्णींवर बोलण्याची किंवा लक्ष देण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर राहुल नार्वेकर यांनी दिले.
मूळ राजकीय पक्ष कोणता, हे आधी ठरवणे आवश्यक
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. दोन्ही गटाकडून प्रतोद निवडीचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. याबाबत तुमची भूमिका काय असेल, असा प्रश्न राहुल नार्वेकर यांना विचारण्यात आला. यावर, यापूर्वीही याबाबत बोललो आहे. यासंदर्भात जी निवेदने माझ्याकडे आली आहेत. त्याचा अभ्यास मी करत आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, मूळ राजकीय पक्षासंदर्भातील निर्णय झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या आदेशात म्हटलेय की, मूळ राजकीय पक्ष कोणता, यासंदर्भात प्रथम आपण निर्णय घ्यावा आणि त्या आधारावर उर्वरित निर्णय घ्यावा.
विद्यमान विधिमंडळात जागेची कमतरता, नवीन वास्तुची गरज
नवीन विधिमंडळ निर्मितीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावर बोलताना, विद्यमान विधिमंडळात जागेची कमतरता जाणवत आहे. एकूणच अद्ययावत तंत्रज्ञान असलेले, सुसज्ज आणि स्पेशिअस इमारत वा वास्तु उभारण्याचा विचार आम्ही करत आहोत. ही बाब अत्यंत प्राथमिक स्तरावर आहे. यासंदर्भातील संपूर्ण प्लान बनवून ठोस निर्णय होईल, त्यावेळी याबाबत सांगितले जाईल, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून मुदतवाढ मागितली जाणार असल्याचे सांगितले जात होते. यावर, आमच्याकडून नोटीस गेलेल्या आहेत. त्यावर उत्तर येणे अपेक्षित आहे. सदर नोटिसीला उत्तरे विधिमंडळ सचिवालयात सादर केली जातील. त्यानंतर ती माझ्यासमोर मांडली जातील, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.