एसटीचा ‘प्रासंगिक करार’; ९ हजार बस दोन दिवस राहणार निवडणूक कर्तव्यावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 05:54 AM2024-11-12T05:54:58+5:302024-11-12T05:55:37+5:30
निवडणुकीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी या बस महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) ९२३२ बस निवडणूक आयोगाला आणि पोलिस प्रशासनाला देण्यात येणार आहेत. या बस १९ आणि २० नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी प्रासंगिक भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. मात्र, या बसची मागणी दिवसातील ठरावीक कालावधीसाठी असल्याने नियमित प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने एसटीकडे दोन दिवसांसाठी नऊ हजार बसची मागणी केली होती. १९ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर मतदान यंत्रे घेऊन जाण्यासाठी ८९८७ बस आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे मतमोजणीच्या ठिकाणी आणण्यासाठी तेवढ्याच गाड्यांची मागणी केली होती. त्याचबरोबर पोलिस प्रशासनाला २४५ बसदेखील देण्यात आल्या आहेत.
एसटीला फायदा होणार
लोकसभेला ज्या गाड्या दिल्या होत्या, त्या मार्ग आणि किलोमीटरप्रमाणे त्यांचे भाडे ठरवण्यात आले होते. त्यावेळी एका बससाठी २४ ते ३० हजार रुपये एसटीला उत्पन्न मिळाले होते. विधानसभा निवडणुकीतही त्याप्रमाणेच भाडेआकारणी होणार असल्याने तसाच फायदा होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
१३३६७ पैकी ९२३२ गाड्या होणार तैनात
एसटीच्या ताफ्यात सध्या स्वमालकीच्या १३३६७ बस असून निवडणुकीच्या कामकाजासाठी मुंबईसह राज्यातील ३१ विभागांतून ९२३२ गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने बस तैनात करणे हे मोठे आव्हान असले तरी मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.