कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 06:11 AM2024-11-15T06:11:08+5:302024-11-15T06:11:46+5:30

मुंबईतल्या मतदारांना घेऊन १९ नाेव्हेंबरला सव्वाशे बस जाणार कोल्हापूर जिल्ह्यात.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Activists started work bus left for the village for voting | कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!

कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!

सुरेश ठमके, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरून येत्या १९ तारखेला सुमारे सव्वाशे खासगी बस गाड्या कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. २० तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या मतदानासाठी मुंबईत राहणाऱ्या कोल्हापूरच्या मतदारांसाठी तेथील उमेदवारांनी नेण्या-आणण्याची चोख व्यवस्था केली आहे. त्यासाठी गावोगावचे पुढारी कामाला लागले आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड या तालुक्यांतील हजारो रहिवासी मुंबईतील ना. म. जोशी मार्ग, परळ, घाटकोपर, विक्रोळी, मानखुर्द या विभागांमध्ये वास्तव्यास आहेत.  लोकसभा अथवा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली की, चंदगड, आजरा आणि शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील उमेदवार थेट मुंबईला धाव घेतात. या परिसरातील मतदारांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मतदानादिवशी हे कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने मतदारसंघात उपस्थित राहतील याची काळजी घेतात. याही वेळी असेच चित्र आहे.  

कोल्हापूर जिल्ह्यातील या पाच तालुक्यांतील सुमारे एक लाखांपेक्षा अधिक मतदार मुंबईत विविध ठिकाणी आहेत. यापैकी अद्यापही गावी मतदारयादीत नावे असलेले ५० हजारांपेक्षा अधिक मतदार मुंबईत आहेत. ही मते उमेदवारांसाठी निर्णायक ठरतात. त्यामुळे कागल मतदारसंघातील समरजित घाटगे, हसन मुश्रीफ या उमेदवारांनी, तर शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील विनय कोरे, सत्यजित पाटील या उमेदवारांनी मुंबईत डिलाईल रोड परिसरात भव्य मेळावे आयोजित करून  मतदारांना मतदानासाठी येण्याचे आवाहन केले होते.

मुंबईतील कार्यकर्त्यांवर जबाबदारी
- मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांमार्फत खासगी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 
- वास्तविक, निवडणुकीवेळी गाड्यांची व्यवस्था उमेदवारांकडून केली जाते. मात्र, यावेळी उमेदवारांनी प्रत्येक गावच्या मुंबईतील कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी सोपविली आहे. 
- या कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील मतदारांची यादी करून बसेस बुक केल्या आहेत. आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी यावेळी मतदारांना गावाला घेऊन जायचेच, असा निर्धार आम्ही केला आहे, असे शाहूवाडी तालुक्यातील सांबवे गावचे कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी सांगितले.

सव्वाशे गाड्यांचे बुकिंग
ना. म. जोशी मार्गावरून शाहूवाडी आणि आजरा, चंदगड येथे दररोज २० खासगी बसेस सुटतात. सर्व गाड्या कार्यकर्त्यांनी १९ तारखेसाठी  बुक केल्या आहेत. याशिवाय अन्य खासगी बसेस आणि स्कूल बसेस मिळून १२५ गाड्या बुक झाल्या आहेत. ट्रव्हल्सनी बसचे भाडेही ७०० रुपयांवरून एक हजार रुपये केले आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी सरसकट ६० हजार रुपयांना प्रत्येक बस बुक केली आहे. मतदारांना मुंबईतून घेऊन जाण्याची आणि परत आणून सोडण्याची जबाबदारी बसगाड्यांवर सोपविली आहे, असे एका ट्रॅव्हल बुकिंग एजंटने सांगितले.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Activists started work bus left for the village for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.