Join us

वरळीत आदित्य, माहीममध्ये अमित: सहज निवडून यावे, असे चित्र आज तरी नाही; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 5:35 AM

माहीम मतदारसंघात अद्याप भाजपचा निर्णय न झाल्याने अमित ठाकरे यांच्या निमित्ताने राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सुरेश ठमके, लोकमत न्यूज नेटवर्क |

मुंबई : किंगमेकर अथवा रिमोट कंट्रोलच्या भूमिकेतून बाहेर पडत निवडणुकीद्वारे संसदीय राजकारणात सक्रिय प्रवेश करणाऱ्या ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना आज तरी कडवी लढत द्यावी लागेल असे चित्र आहे. दुसरीकडे माहीम मतदारसंघात अद्याप भाजपचा निर्णय न झाल्याने अमित ठाकरे यांच्या निमित्ताने राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सहज निवडून यावे, असे चित्र आज तरी नाही.

वरळीसह दक्षिण मुंबई हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. वरळी, शिवडी, दादर - नायगाव, माहीम या मतदारसंघांमध्ये सातत्याने शिवसेनेचाच उमेदवार विजयी होत आला. उमेदवार कोण आहे? हे न पाहता मतदारांनी केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापोटी मतदान केले. त्यामुळेच दगडू सकपाळ यांच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून निवडून येत होता. गेल्या काही वर्षांत या मतदारसंघांतील परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी स्थापन केलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडून निर्माण झालेली शिंदेसेना यामुळे मराठी भाषिक मतदारांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले आहे.

तत्कालीन एकसंध शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून २०१९ च्या निवडणुकीत वरळीवर शिक्कामोर्तब केले. या मतदारसंघातून आ. सचिन अहिर आणि आ. सुनील शिंदे यांच्याऐवजी आदित्य ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी आदित्य यांच्या विजयाबाबत कुणालाच कुठलीच शंका नव्हती. 

काँग्रेसचे सुरेश माने शिवसेनेपुढे टिकाव धरणारे उमेदवार नव्हते. यावेळची परिस्थिती वेगळी आहे. वरळीतून महायुतीच्या वतीने राज्यसभेचे खा. मिलिंद देवरा यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आदित्य यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. त्यातच मनसेने संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवले आहे. मनसेला मानणारा मराठी मतदार वरळीत आहे. त्याचा फटका आदित्य यांना बसेल की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.

प्रतिष्ठा लागली पणाला उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे मुंबईसह राज्यभर प्रचारसभा घेत असले, तरी प्रत्यक्षात या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा त्यांच्या मुलांच्या उमेदवारीमुळे पणाला लागली आहे.  

माहीमसाठी अटीतटीमाहीममध्ये आ. सदा सरवणकर तयारीनिशी उतरले आहेत. शिवसेनेच्या फुटीचा त्यांनाही फटका बसू शकतो. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांनी मतदारसंघावर पकड मिळवली आहे. तर उद्धवसेनेचे महेश सावंत यांची भिस्त शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांवर असेल. अमित ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय डोअर टू डोअर भेटीगाठी घेत आहेत. राज ठाकरे यांच्या नावाच्या करिष्म्यावर मदार असलेल्या अमित ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अटीतटीची असेल.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४अमित ठाकरेमनसेआदित्य ठाकरेमुंबई विधानसभा निवडणूक