विधानसभा निवडणूक: आशिष शेलारांनी मध्यरात्री केला गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 10:48 AM2024-10-29T10:48:42+5:302024-10-29T11:01:00+5:30
मनोहर कुंभेजकर, मुंबई: बोरिवली विधानसभा मतदार संघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज शक्ति प्रदर्शन करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज ...
मनोहर कुंभेजकर, मुंबई: बोरिवली विधानसभा मतदार संघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज शक्ति प्रदर्शन करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याचे काल रात्री जाहिर केले होते.त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष,आमदार अँड.आशिष शेलार यांनी काल मध्यरात्री पोयसर जिमखान्या समोरील त्यांच्या निवासस्थानी भेट देत सुमारे दीड वाजेपर्यंत सुमारे एक तास चर्चा केली. मात्र आपण आपल्या निर्णयावर ठाम असून बोरीवलीकरांच्या सन्मानासाठी अपक्ष लढणार आहे. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे त्यांनी शेलार यांना सांगितले.
गेल्या ३३ वर्षात मी एकही चुकीचं काम केले असेल तर पक्षाने मला सांगावे, मी मरेपर्यंत पक्षाचं मजुराप्रमाणे काम करणार. एवढा मोठा निर्णय घेताना कुणाशीही चर्चा केला नाही हे योग्य नसून वारंवार छळ करणे योग्य नाही. ही लढाई मी लढणार आहे. पक्षाचे नेते असे निर्णय करत असतील, चुकीची माहिती देत असतील तर त्या नेत्यांची हकालपट्टी करावी. पक्षाकडे माझ्याबाबतीत काही माहिती असेल तर ती लोकांसमोर जाहीर करावी असे त्यांनी शेलार यांना यावेळी सांगितले.
बोरिवली विधानसभा मतदार संघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना भाजपाने तिकीट दिले. त्यामुळे काल सुमारे दोन तास मोठ्या संख्येने जमलेल्या भाजप कार्यकर्ते आणि बोरिवलीकरांनी पोयसर जिमखान्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले.गोपाळ शेट्टी यांच्या बंडाने भाजपचा उत्तर मुंबईतील गड ढासाळणार का?यांची चिंता उर्वरित उमेदवारांमध्ये लागली असून त्यांची झोप उडल्याची चर्चा आहे.
यासंदर्भात गोपाळ शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भेटीचा दुजोरा दिला.आपली लढाई आपल्याला बोरीवलीचा आमदार होण्यासाठी नसून तत्वाशी आहे.येथील भाजप उमेदवार संजय उपाध्याय बद्धल विचारले असता ते म्हणाले की,तो एक पक्षाचा चांगला कार्यकर्ता आहे.आपण आज दोघांनी एकत्र उमेदवारी अर्ज भरूया असे त्याला सांगितले.
दरम्यान, आज सकाळी ९.३० वाजता शक्ति प्रदर्शन करत कांदिवली पश्चिम पोईसर जिमखान्यावरून त्यांची नामांकन रॅली निघणार असून दहिसर पश्चिम येथील रुस्तुमजी शाळेत ते त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज सादर करणार आहे.