Join us

“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 1:44 PM

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसने जाणूनबुजून एका ज्येष्ठ नेत्याला विधानसभेसाठी डावलले आहे, असे सांगत रवी राजा यांनी भाजपा प्रवेश केला.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. लवकरच सर्व पक्षांचा प्रचाराचा धडका सुरू होणार आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, जवळपास बहुतांश पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. आता महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांकडून बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याने पक्षावर टीका करत राजीनामा दिला आहे आणि भाजपात प्रवेश केला आहे.

मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा यांना सायन कोळीवाडा या ठिकाणाहून उमेदवारी हवी होती. मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला. रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषवले. रवी राजा तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होते. त्यांच्याबरोबरच बाबू दरेकर ठाकरे गटातील नेत्यानेही भाजपात प्रवेश केला. 

काँग्रेसमध्ये तिकीट वाटपात खूप मोठी घाई झाली आहे. वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेस अध्यक्षा आहेत. त्यांचे तिकीट वाटपात संपूर्ण श्रेय आहे. वर्षा गायकवाड यांचे वडील खासदार होते. त्यानंतर त्या आमदार झाल्या आणि आता खासदार झाल्या. आता त्यांच्या बहिणीला तिकीट दिले आहे. ४४ वर्षे काँग्रेसचे काम केले. काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष सोडण्याचे कारण म्हणजे जो पाच वेळा नगरसेवक बनला आहे, जो मुंबई महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता होता आणि जेव्हा आमदारकीसाठी उमेदवारी मागतो तेव्हा दिले जात नाही. धारावी विधानसभेत काँग्रेसमध्ये येऊन चार महिने सुद्धा न झालेल्याला तिकीट दिले आहे. जाणूनबुजून एका ज्येष्ठ नेत्याला विधानसभेत डावलले आहे. नाराज होऊन मी हा निर्णय घेतला आहे. आता मी मुंबई भाजपचा उपाध्यक्ष झालो आहे, अशी प्रतिक्रिया रवी राजा यांनी दिली.

दरम्यान, काँग्रेसला कोल्हापूरमध्येही मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तसेच नवीन उमेदवार निवडतानाही त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, असा आरोप आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. जाधव यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४काँग्रेसभाजपा