Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एकीकडे घटनेची प्रत उंचावून दाखवायची आणि दुसरीकडे अराजकतावादी शक्तींच्या पाशात अडकायचे, संविधानाचा आग्रह एकीकडे धरायचा आणि दुसरीकडे या संविधानाला मूठमाती देऊ पाहणाऱ्या शक्तींना गोंजारायचे अशी बेगडी वृत्ती त्यातून दिसते. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या विचारांना केव्हाच बगल दिली असून ते पूर्णपणे अर्बन नक्षल्यांच्या अविचाराने घेरले गेले आहेत, अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, घटनेची प्रत ते अनेक प्रसंगांमध्ये दाखवतात. नेहमीच्या निळ्या रंगाऐवजी त्या घटनेच्या प्रतीला लाल कव्हर लावलेले असते. अराजकतावादी आणि अर्बन नक्षलवाद्यांनी राहुल गांधी यांना घेरले आहे. त्यांनी भारत जोडो यात्रा काढली तेव्हा असे वाटले होते की चला! काही नाही तर भारत जोडायला तरी निघाले आहेत पण प्रत्यक्षात काय घडले? त्यांच्या यात्रेमध्ये १८० संघटना अशा होत्या, ज्या विध्वंसक मानल्या जातात, हे मी म्हणतो म्हणून नाही तर ते रेकॉर्डवर आहे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
राहुल गांधी अमेरिकेत बोलले की, कालांतराने आरक्षण समाप्त केले जाईल
लोकसभा निवडणुकीला भाजपा, पंतप्रधान मोदींविरुद्ध जे नरेटिव्ह काँग्रेसकडून पसरविण्यात आले त्याचा एक फटका तुम्हाला बसला, त्या नरेटीव्हचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही बसेल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, लोकसभेवेळी भाजपा संविधान बदलणार अशी आवई उठविली गेली, त्यातील फोलपणा आता सिद्ध झाला आहे. संविधानाला धक्का लावला जाणार नाही अशी ग्वाही मोदींनी दिलीच आहे. राहुल गांधी अमेरिकेत बोलताना म्हणाले की, कालांतराने आरक्षण समाप्त केले जाईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या विधानांचे समर्थन केले. व्होट जिहाद लोकसभेवेळी झाला. त्याचा फटका आम्हाला दहा लोकसभा मतदारसंघांमध्ये बसला. भाजपाच्या विरोधात मतदान करा, असे सांगितले गेले. त्यातून अल्पसंख्यकांची मते भाजपाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जातील हे बघितले गेले. आपली फसवणूक मविआने केल्याचे अल्पसंख्यकांनाही कळले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, नागपुरात होत असलेल्या ओबीसी सन्मान संमेलनात राहुल गांधी भाषण देणार आहेत, मात्र या संमेलनात पत्रकारांना मज्जाव करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करण्यात आली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.