उद्धव ठाकरे की शरद पवार? महायुतीची द्वारे कोणाला खुली होणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 03:00 PM2024-10-30T15:00:31+5:302024-10-30T15:06:13+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आदित्य ठाकरेंना हिंदुत्व शिकवायची गरज नाही, हे बरोबर आहे, कारण त्यांना ते शिकवायला अबू आझमी आहेत. जे हिंदुत्व बाळासाहेबांचे होते, शिवसेनेचे होते, ते हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी संपवले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यावरून जाहीरपणे व्यक्त झालेली नाराजी आणि बंडखोरी करत अपक्ष म्हणून भरलेले अर्ज यावरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचे दरवाजे खुले होणार का, यासंदर्भात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले.
आमच्या हिंदुत्वाबद्दल बोलायची गरज नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी कधीच हरवले. आदित्य ठाकरे यांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, हे बरोबर आहे, कारण त्यांना शिकवण्यासाठी अबू आझमी आहेत. बाळासाहेबांना जनाब म्हटले जाते, जे हिंदुत्व बाळासाहेबांचे होते, शिवसेनेचे होते ते हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी संपवले. ना मला ठाकरे संपवू शकतात, ना मी त्यांना संपवू शकत. कोणाला संपवायचे हे जनता ठरवते, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले.
लोकसभा निवडणुकीतून आम्हाला चांगला अनुभव मिळाला
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तीन पक्षांनी आम्हाला हरवले नाही. आम्हाला फेक नेरेटिव्हने हरवले. तीन पक्ष आम्हाला हरवू शकलेच नसते. फेक नेरेटिव्ह कंट्रोल करण्यात आम्ही कमी पडलो. त्याचे आकलन नीट करु शकलो नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीतून आम्हाला चांगला अनुभव मिळाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच आम्ही नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही. नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नका, हे आम्ही अजित पवार यांना सांगितले होते. मात्र अजित पवारांनी त्यांना एबी फॉर्म दिला. अजित पवारांनी असे का केले, हे तेच सांगू शकतात, त्यांना विचारा, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जागा कमी पडल्या तर उद्धव ठाकरे की शरद पवार कोणासाठी दरवाजे खुले करणार, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. कुणाची गरज लागणार नाही, आम्ही तिघे पुरेसे आहोत, तशी परिस्थितीची येणारच नाही. २३ तारखेची वाट बघा. तसेच मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला आम्ही निकालानंतर ठरवू. सरकार म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आमचा चेहरा आहेत. मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही ठरवले आहे. जो काही निर्णय होईल तो निकालानंतर होईल. रोटेशनल मुख्यमंत्री अशी कोणतीही अट एकनाथ शिंदे यांनी ठेवली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलत होते.