Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यानंतर भाजपा नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेत पलटवार केला.
महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती व राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील आहे. पंतप्रधान मोदींचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरु आहे. धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका व्यक्तीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असून मोदींची घोषणा ‘एक हैं तो सेफ हैं’ म्हणजे फक्त अदानी व मोदी ‘एक हैं आणि सेफ ही हैं’ असा जोरदार प्रहार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत एक बंद तिजोरी (सेफ) आणली. त्यात मोदी आणि अंबानींचा फोटो आणि धारावीचा नकाशा ठेवण्यात आला होता. अदानी-मोदी देश लुटण्यासाठी ‘एक है तो सेफ है’ असा आरोप तिजोरी दाखवत राहुल गांधी यानी केला. यावर विनोद तावडे यांनी तसेच फोटो दाखवत प्रत्युत्तर दिले.
एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?
भाजपा, मोदी आणि अदानी हे नाते जोडले जात आहे, ते खरे नाही. एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है. गौतम अदानी यांचा जो विकास झाला, तो काँग्रेसच्याच काळात झाला. केवळ देशात नाही, तर परदेशातील विकासही काँग्रेसच्याच काळात झाला. सन २०१४ नंतर आणि २०१४ च्या आधी अदानी यांना मिळालेल्या प्रकल्पांची एक यादी आहे. ज्यावेळी काँग्रेसने तेलंगाणामध्ये १२,४०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला, तेव्हा हे अदानी कोणाचे होते. राजस्थानमध्ये ४६ हजार कोटी रुपयांचा सोलार प्रोजेक्ट अदानी यांच्याबरोबर करण्यात आला. तेव्हा गेहलोत कोणाचे होते? अदानी कोणाचे होते, अशी विचारणा विनोद तावडे यांनी केली.
महाविकास आघाडीच्या काळात दिघी पोर्टचे काम मिळाले
पंजाबमध्ये भटींडाचा प्रकल्प मिळाला. महाविकास आघाडीच्या काळात दिघी पोर्टचे काम मिळाले. भूपेश बघेल यांनी अदानी यांना माइन डेव्हलपर आणि ऑपरेटरचे काम छत्तीसगडमध्ये दिले. अशोक गेहलोत यांनी राजस्थानमध्ये दहा हजार मेगावॅटचा प्रकल्प कसा उभा केला, अशोक गेहलोत यांनी जयपूरचे विमानतळ उभारले. राजीव गांधींच्या काळात माझी ग्रोथ झाली असे अदानी स्वत: म्हणाले आहेत, असे सांगत विनोद तावडे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत ८ पैकी ६ नेते बाहेरच्या राज्यातील होते, तर फक्त दोन नेते राज्यातील होते. यावेळी त्यांनी एक सेफ काढली, त्यातून फोटो काढले. अदानी आणि मोदी यांचे हे फोटो होते. असे फोटो काढायचे तर अदानी आणि वाड्रा यांचे आहेत. असे फोटो गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री असताना, शशी थरूर यांच्याबरोबर, तेलंगणमधील मुख्यमंत्री यांच्या सोबत, हरियाणातील २०१४ आधी मुख्यमंत्र्यांबरोबरचे असे अनेक फोटो आहेत. अदानी आणि काँग्रेसचे नाते कसे जुने आहे, हे सांगू शकतो, असे विनोद तावडे यांनी स्पष्टपणे सांगितले.