मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 07:11 AM2024-11-14T07:11:28+5:302024-11-14T07:12:49+5:30
पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर तसेच कार्यक्रमस्थळी जाण्याच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता, गुरुवारी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवाजी पार्कवर आज, गुरुवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक मार्गात बदलही केला आहे. मोदींच्या सभेसाठी सर्व प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर तसेच कार्यक्रमस्थळी जाण्याच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता, गुरुवारी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
या रस्त्यांवर वाहने उभी केल्यास कारवाई
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग : बाबासाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी जंक्शन) ते हरी ओम जंक्शन, माहीम, केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग (शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोड), एल. जे. रोड (गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल), एन. सी. केळकर मार्ग (हनुमान मंदिर सर्कल ते गडकरी जंक्शन), टी. एच. कटारिया मार्ग (गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन माहीम), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड (महेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन).
पर्यायी मार्ग कोणते?
- स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग उत्तर वाहिनी सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक जंक्शन या ठिकाणच्या प्रवासासाठी सिद्धिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण घेऊन एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, डावे वळण गोखले रोड किंवा एस. के. बोले मार्ग या रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे.
- स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनी येस बँक जंक्शन ते सिद्धिविनायक मंदिर जंक्शनसाठी पर्यायी दांडेकर चौक येथे डावे वळण घेऊन पांडुरंग नाईक मार्गे राजाबढे चौक येथे उजवे वळण घेऊन एल. जे. रोड मार्गे गोखले रोड किंवा एन. सी. केळकर रोड या रस्त्यांचा वापर करावा.
स्ट्राँग रूमच्या सुरक्षिततेसाठी...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे वाहतूक विभागाच्या हद्दीतील खार पश्चिमेकडील आर. व्ही. टेक्निकल हायस्कूल या ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आले आहे. येथील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी १८ नोव्हेंबर रात्री ११ पासून ते २३ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात खार (पश्चिम) १७ वा रस्ता हा चित्रकार धुरंदर मार्ग जंक्शन ते साऊथ अॅव्हेन्यू जंक्शन, खार (पश्चिम) १८ वा रस्ता हा चित्रकार धुरंदर मार्ग जंक्शन ते साऊथ अॅव्हेन्यू जंक्शन, खार (प.) १९ वा रस्ता हा चित्रकार धुरंदर मार्ग जंक्शन ते साऊथ अॅव्हेन्यू जंक्शन, खार (प.) २० वा रस्ता नो पार्किंग झोन असेल.