मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभेला येणे शक्य नसल्याने फोनद्वारे मतदारांशी संवाद
By मनीषा म्हात्रे | Published: November 17, 2024 09:46 PM2024-11-17T21:46:19+5:302024-11-17T21:48:32+5:30
आपल्याला बदल घडवायचा आहे. परिवर्तन घडवायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मनीषा म्हात्रे, मुंबई: भांडुपमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार अशोक पाटील यांच्यासाठी गाढव नाका येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक मध्ये अडकल्याने त्यांना सभेला उपस्थित राहता आले नाही. यावेळी त्यांनी फोनद्वारे मतदारांशी संवाद साधला. यावेळी, विजयाची मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी सभेला संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले, पाटील यांच्याकडे येणार होतो. मात्र आता उशीर झाल्याने येणे शक्य नाही. मी विजयाचा गुलाल उधळायला येणार आहे. भांडुप मध्ये अनेक काम रखडली आहेत.
आपल्याला खड्डे मुक्त मुंबई करायची आहे. ज्यांनी बाळासाहेब यांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यांना धडा शिकविण्यासाठी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांच्या मागे मी ठामपणे उभा आहे. सर्व योजना पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शनिवार याच ठिकाणी उद्धव सेनेचे उमेदवार रमेश कोरगावकर यांच्यासाठी आयोजित केलेल्या सभेला उद्धव ठाकरे यांनाही वाहतूक कोंडीत अडकल्याने सभेला येणे शक्य नव्हते. त्यांनीही फोनद्वारे माफी मागून सभा उरकली होती.
भाजप पदाधिकारी म्हणे, महाविकास आघाडीला विजयी करा...
महायुतीच्या भांडुप येथील गाढव नाका येथे सुरू असलेल्या प्रचार सभेत भाजपचे भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहीतुले यांना भाषणात पक्षाचा काहीसा विसर पडल्याचे दिसून आले. भाषणाच्या अखेरीस त्यांनी महाविकास आघाडीला विजयी करा असे तीन वेळा म्हणत भाषण संपविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. "अहो, साहेब तुम्ही युतीत...आघाडीत नाही" अशीही कुजबुज ऐकू आली. त्यानंतर चूक लक्षात आल्यानंतर निवेदकाद्वारे त्यांनी केलेल्या विधानाची दुरुस्ती करत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. दुसऱ्या एका प्रवक्त्याने थेट अशोक कदम यांना विजयी करण्याचे आवाहन केल्याने त्यांनाही वेळीच खाली बसविण्याची वेळ आली.
हे आमदार देखील गुवाहाटीला निघाला होते...
अशोक पाटील - शिंदेसेना उमेदवार, माजी आमदार अशोक पाटील यांनी यावेळी प्रतिस्पर्धी उद्धव सेनेचे उमेदवार रमेश कोरगावकर यांची निष्ठा किती घनिष्ठ आहेत म्हणत आरोप केले. तसेच, गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांमध्ये ते देखील एका हॉटेल मध्ये बॅग घेवून थांबल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. पुढे, गुवाहाटी जाण्यासाठी तुम्ही तीन आमदार सोबत एका हॉटेल मध्ये तुमच्या बॅगा मागवून घेतल्या. रमेश कोरगावकर गुवाहाटीला निघाले ही माहिती मिळताच थेट पोलिसांनी ताब्यात घेतले. हीच तुमची निष्ठा का? प्रत्येक बिल्डरची कामे तुम्हीच घेतली. खड्डा तुम्हीच मारला..शिगा तुम्हीच दिल्या. बिल्डिंग उभी राहिल्यानंतर केबल देखील तुमच्या जावयाची. चौका चौकात २५ लाखांचे चौक बनवले त्यातही फक्त स्वतः चे फोटो लावले. दहा सीटचे शौचालय देखील बनवू शकले नाही. हा फक्त बिल्डरचा मित्र आहे. या बिल्डरचा संगनमत करून स्वतः ची पोळी भाजण्याचे काम त्यांनी केले आहे. काल रात्री तीन वाजता मतदार संघात होते. आता मतदार संघात फिरणे सुरू झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभेला येणे शक्य नसल्याने फोनद्वारे मतदारांशी संवाद. #MaharashtraAssemblyElections2024#EknathShindepic.twitter.com/1eMc5lNOTj
— Lokmat (@lokmat) November 17, 2024