Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आश्वासने, शब्द, गॅरंटी, वचने दिली जात आहे. महाराष्ट्रात आमचीच सत्ता येणार, असे दावे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीला विधानसभेत किती जागा मिळतील, याबाबतही दावे केले जात आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक थेट आकडाच सांगत महायुतीला किती जागा मिळतील, याबाबत सूतोवाच केले आहे.
विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पोल येऊ लागले आहेत. यावरून महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते दावे-प्रतिदावे करताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीला १७० ते १८० किंवा त्याहून जास्त जागा मिळतील, असे दावे केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही महायुतीला किती जागा मिळतील, याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
पदासाठी नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासाठी आम्ही त्या सत्तेतून बाहेर पडलो
आम्ही सत्ता सोडून विरोधी बाजूने गेलो, काय होईल ते माहिती नव्हते. ज्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली आणि महाविकास आघाडी स्थापन करुन बाळासाहेब ठाकरेंचे विचार धुळीला मिळवले अशा लोकांबरोबर आम्ही थांबलो नाही. पदासाठी नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासाठी आम्ही त्या सत्तेतून बाहेर पडलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
महायुती सरकारने सगळ्या गोष्टींना गती दिली
महाविकास आघाडीने अडीच वर्षांत केलेले काम आणि महायुतीने दोन ते सव्वादोन वर्षांत केलेले काम याचा आढावा घेतला तरी फरक लक्षात येईल. सगळ्या गोष्टी बंद पाडणे हे महाविकास आघाडी सरकारचे काम होते. तर सगळ्या गोष्टींना गती देणे हे काम आमच्या महायुती सरकारने करुन दाखवले. आमच्याकडे खरी शिवसेना आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडे आहे. लोकसभेत निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा गट आणि शिवसेना यांच्यात १३ ठिकाणी लढत होती. त्यातल्या सात जागा आम्हाला मिळाल्या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करून सांगितले.
आम्हाला चांगले यश मिळेल
महायुतीला किती जागा मिळतील, या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिले. लोकांचे प्रेम, लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल. आमच्या १७० जागा तरी येतील, असा विश्वास मला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.