राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 08:23 PM2024-11-17T20:23:37+5:302024-11-17T20:24:02+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: माहीम मतदारसंघात दिलेली उमेदवारी आणि राज ठाकरेंची शिवसेना शिंदे गटावरील टीका यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमके काय घडले, याबाबत सवाल करण्यात आले.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे राज्यातील आणि केंद्रातील नेते जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. यातच काही गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. राज ठाकरे यांच्यासोबतचे संबंध चांगले असताना बिनसले कुठे, या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देताना काय घडले, ते सगळेच सांगितले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे संपूर्ण ताकदीने लढत आहे. राज ठाकरे राज्यभर दौरे करत असून, जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. परंतु, माहीम मतदारसंघावर राज्याचे लक्ष लागले आहे. मनसेकडून राजपुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली. तर शिवसेना शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली. ठाकरे गटाकडून महेश सावंत रिंगणात आहेत. अशातच सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी प्रयत्न झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनधरणी करायचा प्रयत्न केला. परंतु, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत यश आले नाही. त्यामुळे माहीम मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. माहीमची जागा आणि राज ठाकरेंकडून होत असलेली टीका याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आले.
ते आमचे स्नेही आहेत, मित्र आहेत
माहीमच्या जागेवरून आपले आणि राज ठाकरे यांच्यासोबत असलेले संबंध गडबडलेत का, असा पश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, थोडा कम्युनिकेशन गॅप नक्की झालेला आहे. शेवटी तेही एका पक्षाचे प्रमुख आहेत. मीही एका पक्षाचा प्रमुख आहे, मुख्यमंत्री पण आहे. शेवटी काही गोष्टींची चर्चा वेळेवर होणे आवश्यक आहे. त्यांनाही कार्यकर्ता जपायचा असतो आणि आम्हालाही जपायचा असतो. पक्ष चालवायचा आहे. ते आमचे स्नेही आहेत, मित्र आहेत. या सगळ्या घडामोडीत कधी वादविवाद होऊ नयेत, अशी माझी इच्छा असते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले?
शिवसेना हे नाव आणि चिन्ह हिसकावून एकनाथ शिंदे यांनी चूक केली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच प्रचारसभांमधून राज ठाकरे शिवसेना शिंदे गटावर टीका करताना दिसत आहेत. यासंदर्भात राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले, या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज ठाकरे यांनी काय बोलायचे, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी काय बोलायचे, काय ठेवायचे, हे ते ठरवतील. त्यांच्याशी माझी नेहमीच समन्वयाची भूमिका राहिली आहे. ते माझ्याकडे कामे घेऊन यायचे, मी त्यांना मदत करायचो. पण आता निवडणूक असल्यामुळे माणूस भाषणात बोलतो, त्यावर मी फार विचार करत नाही. माझा त्यांच्याशी काही वादविवाद नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.