Join us

गरिबांचा पैसा गरिबांना दिला तर भाजपाला पोटदुखी का?; सुखविंदर सुक्खू यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 5:00 PM

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राप्रमाणेच हिमाचल प्रदेशने ऑपरेशन कमळ याचा सामना केला. जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर, सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली, असे सुखविंदर सुक्खू यांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये देशाच्या पंतप्रधानांचा आणि भाजपाच्या नेत्यांचा खोटारडेपणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उघडा करून भाजपाला प्रत्युत्तर दिले. तसेच या गॅरंटी कशा पद्धतीने लागू केल्या आहेत व त्यांचा किती लोकांना लाभ झाला आहे, याची आकडेवारीसह सविस्तर माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे केंद्रातील आणि राज्यातील नेते राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. यातच काँग्रेसने कर्नाटक, तेलंगण, हिमाचल प्रदेशात जाहीर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत, अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, असा पलटवार काँग्रेसच्या विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी भाजपावर केला आहे.

सत्याला नेहमीच असत्याशी सामना करावा लागतो 

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी भाजपाचा खोटेपणा उघड करताना सांगितले की, सत्याला नेहमीच असत्याशी सामना करावा लागतो. महाराष्ट्राप्रमाणेच हिमाचल प्रदेशनेही ऑपरेशन कमळचा सामना केला पण जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली. काँग्रेसचे सरकार येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जूनी पेन्शन योजना लागू केली. ज्यांना ५००० रुपये मिळत होते त्यांना आता ५० हजार रुपये मिळत आहेत. मक्याला प्रतिकिलो ३० रुपये, गहू ४० रुपये किलो तर गाईच्या दूधाला प्रति लिटर ४५ तर म्हशीच्या दुधाला ५५ रुपयांचा हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. ५८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. १८ वर्षांवरील मुलींना १५०० रुपये तर वैद्यकीय शिक्षण, पीएचडी करणाऱ्या मुलींनाही आर्थिक मदत दिली जात असल्याचे सांगत या गॅरंटींची पूर्तता करण्यासाठी महसूल उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत, असे सुक्खू यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर मुठभर अरबपतींचे १२ लाख कोटी रुपये माफ करू शकतात तर काँग्रेस सरकारने गरिबांचे पैसे गरिबांनाच दिले तर भाजपाची पोटदुखी का होते? असा प्रतिसवाल यावेळी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपला विचारला. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४काँग्रेसमहाविकास आघाडी