Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे केंद्रातील आणि राज्यातील नेते राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. यातच काँग्रेसने कर्नाटक, तेलंगण, हिमाचल प्रदेशात जाहीर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत, अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, असा पलटवार काँग्रेसच्या विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी भाजपावर केला आहे.
काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये देशाच्या पंतप्रधानांचा आणि भाजपाच्या नेत्यांचा खोटारडेपणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उघडा करून भाजपाला चोख प्रत्युत्तर दिले. तसेच या गॅरंटी कशा पद्धतीने लागू केल्या आहेत व त्यांचा किती लोकांना लाभ झाला आहे, याची आकडेवारीसह सविस्तर माहिती दिली.
काँग्रेस गॅरंटीची पूर्तता पाहायला भाजपाने कर्नाटकात यावे
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाटकात २२ दिवसांचा पदयात्रा केली. यावेळी जनतेला भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचे प्रश्न जाणून घेतले व त्यातूनच कर्नाटकात ६ गॅरंटी देण्यात आल्या. काँग्रेस सत्तेत येताच त्याची अंमलबजावणी सुरु केली. कर्नाटकातील १ कोटी २२ लाख महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दरमहा २००० रुपये मिळत आहेत. १ कोटी ६४ लाख कुटुंब ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेत आहेत. ४.०८ कोटी लोकांना ‘अन्नभाग्या’ योजनेअंतर्गत १० किलो मोफत तांदूळ दिले जात आहेत. ‘शक्ती’ योजनेतून आतापर्यंत ३२० कोटी महिलांनी मोफत बस प्रवास केला आहे. ‘युवा निधी’ योजनेद्वारे ५ लाख विद्यार्थ्यांना महिन्याला ३००० रुपये मिळत आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर ६० दिवसात या सर्व गॅरंटी लागू केल्या असून यासाठी ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. कर्नाटकाचे बजेट ३ लाख ६५ हजार कोटींचे असून देशातील अनेक भाजप शासित राज्यांपेक्षा कर्नाटकचा अर्थव्यवस्था उत्तम आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विशेष विमान व बससेची व्यवस्था करतो त्यांनी कर्नाटकात येऊन ३३ जिल्ह्यांचा प्रवास करून जनतेला या गॅरंटीबद्दल विचारून खात्री करुन घ्यावी, असे खुले आव्हान डी. के. शिवकुमार यांनी दिले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर मुठभर अरबपतींचे १२ लाख कोटी रुपये माफ करू शकतात तर काँग्रेस सरकारने गरिबांचे पैसे गरिबांनाच दिले तर भाजपाची पोटदुखी का होते? असा प्रतिसवाल यावेळी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपला विचारला.