Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यावरून जाहीरपणे व्यक्त झालेली नाराजी आणि बंडखोरी करत अपक्ष म्हणून भरलेले अर्ज यावरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच भाजपासह अन्य पक्षांचे सभा, दौरे यांचे नियोजन जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.
याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून, सायंकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत, असे नाना पटोले यांनी सांगितले.
१० लाख नोकऱ्या भाजपा महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला
महायुती सरकारने दोन वर्षांचे प्रगती पुस्तक जाहीर केले पण या सरकारने महाराष्ट्राची प्रगती केलेली नाही तर केवळ महायुती सरकारमधील धोकेबाजांची प्रगती झालेली आहे आणि महाराष्ट्राची दुर्गती केली आहे. भाजपा युती सरकारच्या काळात महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे, दोन वर्षात महिला अत्याचारांच्या ६७ हजार ३८१ प्रकरणांची नोंद झालेली आहे, दर तासाला महिला अत्याचाराच्या ५ तक्रारींची नोंद झालेली आहे. राज्यातील ६४ हजार मुली, महिला बेपत्ता आहेत तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा नागपुरातून १३ हजार मुली महिला बेपत्ता आहेत. महिलांप्रमाणे शेतकरीही दर्लक्षित राहिला. देवेंद्र फडणवीस कितीही दावा करत असले तरी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग प्रकल्पही गुजरातने पळवला. महाराष्ट्रातील ९ लाख कोटींचे प्रकल्प व १० लाख नोकऱ्या भाजपा महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
दरम्यान, या सरकारच्या काळात २० हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. देशातील सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत ही चिंतेची बाब आहे. एक रुपयात विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी नसून विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. भाजपा युती सरकारच्या काळात विमा कंपन्यांना ४ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे. आरोग्य विभागात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून रुग्णवाहिकांच्या खरेदीत ८ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. आरोग्य विभागात तब्बल २० हजार पदे रिक्त आहेत. शिक्षण क्षेत्रातही अनागोंदी कारभार असून ४४ लाख मुलांना अजून गणवेशही मिळालेले नाहीत. राज्यातील जिल्हा परिषदेच्या १४ हजार शाळा बंद करुन गरिब व मध्यमवर्गियांना शिक्षणापासून वंचित करण्याचे काम सुरु झाले आहे. दत्तक शाळा योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा अदानीला देण्यात आली आहे, असे आरोप नाना पटोले यांनी केले.