Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 08:44 PM2024-11-23T20:44:38+5:302024-11-23T20:48:38+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने घवघवीत यश दिले. अवघ्या ५ महिन्यात एवढा बदल होईल असे वाटत नाही, असे काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. जवळपास सर्वच ठिकाणचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत. महायुतीचा दणदणीत विजय झाला असून, महाविकास आघाडी चांगलीच चितपट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अद्यापही अनेक ठिकाणचे अंतिम निकाल येणे बाकी असले तरी राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जनतेच्या अपेक्षित भावनांच्या विरोधातील आहे. राज्यातील सर्वच स्तरातील प्रमुख लोक, काँग्रेस व मविआचे नेते, पदाधिकारी, तळागाळातील कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी संवाद साधला असता हा निकाल अपेक्षित नव्हता असाच सुर निघत आहे. एक्झिट पोल मध्येही भाजपा युती व महाविकास आघाडी यांच्यात काटें की टक्कर दिसली. परंतु आज आलेला निकाल हा अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह आहे, असे चेन्नीथला यांनी सांगितले.
जनतेचाही या निकालावर विश्वास बसलेला नाही
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने घवघवीत यश दिले आणि अवघ्या ५ महिन्यात एवढा बदल होईल असे वाटत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभर दौरे केले, लोकांशी संवाद साधला, पूर्ण तयारीनिशी निवडणुका लढल्या. राज्यात शेतकऱ्यांपुढे गंभीर समस्या आहेत, महागाई, बेरोजगारी, सरकारचा भ्रष्टाचार असे मुद्दे असताना केवळ लाडकी बहिण या मुद्द्यावरून एवढा मोठा निकाल कसा लागू शकतो, जनतेचाही या निकालावर विश्वास बसलेला नाही, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अत्यंत कमी मताने विजया झाला तर आठ वेळा विजयी झालेले बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांचा पराभव झाला आहे. या पराभवाची जबाबदारी आपण घेत आहोत असे सांगून जनतेच्या प्रश्नासाठी व लोकशाहीच्या बचावासाठी काँग्रेस पक्ष यापुढेही अधिक जोमाने काम करत राहील, असेही चेन्नीथला म्हणाले.