Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीचे केंद्रातील आणि राज्यातील नेते राज्यभर प्रचारसभा घेत असून, महाविकास आघाडीचे केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व महाराष्ट्रभर सभा घेताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसने कर्नाटक, तेलंगण, हिमाचल प्रदेशात जाहीर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत, अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, असा पलटवार काँग्रेसच्या विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी भाजपावर केला आहे.
काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये देशाच्या पंतप्रधानांचा आणि भाजपाच्या नेत्यांचा खोटारडेपणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उघडा करून भाजपाला चोख प्रत्युत्तर दिले. तसेच या गॅरंटी कशा पद्धतीने लागू केल्या आहेत व त्यांचा किती लोकांना लाभ झाला आहे, याची आकडेवारीसह सविस्तर माहिती दिली.
धोका देणाऱ्या भाजपाच्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा देऊ नका
तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी स्वतंत्र तेलंगणचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पूर्ण केले. विधानसभा निवडणुकीच्य वेळी ६ गॅरंटी जाहीर केल्या होत्या. तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांची कर्जमाफी दिली, याचा फायदा २२ लाख शेतकऱ्यांना झाला असून, यासाठी बळीराजाला कोट्यवधी रुपये वितरीत केले. १० महिन्यात ५० हजार सरकारी नोकऱ्या दिल्या. महालक्ष्मी योजनेअंतर्गत मोफत बस प्रवास सुरु केला असून, आतापर्यंत बस महामंडळाला ३४०० कोटी रुपये दिले आहेत. ५९ लाख कुटुंबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर दिले जात आहे. गृहज्योती योजनेअंतर्गत ५० लाख कुटुंबांना २०० युनिट वीज मोफत दिली जात आहे. महालक्ष्मी योजनेसाठी दरवर्षी ४ हजार कोटी असे पाच वर्षांसाठी २० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून त्याची तरतूद केली आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी जानेवारी २०२५ पासून तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना सुरु केली जाणार आहे, असे रेवंत रेड्डी यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणात कर्जमाफी दिली नाही असे ट्विट केले होते पण मी त्यांना कर्जमाफीचा अहवाल पाठवल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले. भाजपाकडे सांगण्यासारखे काहीही नाही म्हणून ते काँग्रेस विरोधात जनतेची दिशाभूल करत आहेत. महाराष्ट्र म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आठवतात पण या महान शक्तीशाली महाराष्ट्राला भाजपच्या शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या सरकारने गुजरातला गहाण ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा भाजपाच्या हातात देऊ नका, असे आवाहन रेवंत रेड्डी यांनी केले.