Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा मनसे पक्ष संपूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी मनसे पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. यातच या निवडणूक निकालानंतर मनसे सत्तेत दिसेल. मनसेच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल, असे विधान राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांनी केलेल्या या विधानावर भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सूचक विधान केल्याचे सांगितले जात आहे.
या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार की महायुतीसोबत जाणार, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. काम महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडी निश्चित नाही. शिवसेनेत होतो, तेव्हापासून दुसरा कोणता पक्ष माझ्या आयुष्यात आला असेल, तर तो म्हणजे भाजपा आहे. यंदाच्या निवडणुकीत मनसे सत्तेत असेल. मला वाटतेय, त्याप्रमाणे भाजपाचा मुख्यमंत्री होईल. आमच्या साथीने होईल, असे राज ठाकरे म्हणाले होते. यावर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
महायुती सरकार येणार आहे, महायुतीचाच मुख्यमंत्री असेल
राज ठाकरे यांच्या विधानासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर, मी राज ठाकरेंचा आभारी आहे. त्यांच्या शुभेच्छा नम्रपणे स्वीकारतो. पण भाजपाचे सरकार येणार नसून महायुतीचे सरकार येणार आहे. महायुतीचाच मुख्यमंत्री असेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरे उघडपणे भाजपाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे उत्तर भारतीयांचे मत भाजपापासून दूर जाईल का? असा प्रश्न यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर, लोकसभेलाच याबद्दल बोललो आहे. राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे. इतर पक्षांच्या प्रादेशिक भूमिकांचे तर आम्ही नेहमीच स्वागत करत आलो आहोत. प्रादेशिक अस्मितेबरोबरच राष्ट्रीय अस्मिताही स्वीकारणे गरजेचे असते. राष्ट्रीय अस्मिता म्हणजेच हिंदुत्व आणि हे राज ठाकरेंनी स्वीकारले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.