मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 06:20 AM2024-11-16T06:20:26+5:302024-11-16T06:20:54+5:30
मतदारांचा गोंधळ उडू नये आणि त्यांना त्यांच्या मतदान बूथपर्यंत पोहोचता यावे, यासाठी आता रंगीत कार्पेटचा वापर करण्यात येणार आहे.
सुरेश ठमके, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपले मतदान बूथ शोधताना मतदारांचा गोंधळ होऊ नये, यासाठी आता निवडणूक आयोगाने मतदारांसाठी रंगीत कार्पेट घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मतदारांना आपल्या बूथपर्यंत या रंगीत कार्पेटवरून सहज जाता येणार आहे, अशी माहिती वरळीचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबईतील अनेक मोठ्या रहिवासी संकुलांमध्ये मतदारांसाठी मतदान केंद्र सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मात्र, अनेक ठिकाणी शाळा अथवा मोकळ्या मैदानात मतदान केंद्रे उभारली जात आहेत. एखाद्या मतदान केंद्रावर दहापेक्षा अधिक मतदान बूथ असतील तर मतदारांचा गोंधळ उडू नये आणि त्यांना त्यांच्या मतदान बूथपर्यंत पोहोचता यावे, यासाठी आता रंगीत कार्पेटचा वापर करण्यात येणार आहे.
मतदारांसाठी आयोगाने अंथरलेल्या या रंगीत कार्पेटवरून मतदारांना आता कोणताही त्रास न होता, अथवा लांबच लांब रांगा न लागता सहज त्यांच्या मतदान बूथपर्यंत पोहोचता येणार असल्याने मतदारांनी निश्चितपणे मतदान केंद्रात यावे, असे आवाहन डॉ. गायकवाड यांनी केले आहे.
अशी असणार आहे व्यवस्था
- मतदान केंद्राच्या मुख्य दरवाजापासूनच चार रंगांच्या पट्ट्या अंथरलेल्या असतील. प्रत्येकी तीन ते चार मतदान बूथसाठी एका रंगाच्या कार्पेटची पट्टी अशी विभागणी करण्यात आली आहे.
- निळ्या, हिरव्या, पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या या पट्ट्या मतदारांना त्यांच्या नेमक्या बूथपर्यंत घेऊन जातील. ज्या बूथमध्ये मतदाराचे मतदान आहे. त्या बूथसाठी असलेल्या रंगाची पट्टी मतदारांना देण्यात आलेल्या स्लीपवर नोंदवण्यात आली आहे.
- त्यामुळे मतदारांना त्या रंगाच्या पट्टीवरून आपल्या मतदान बूथपर्यंत सहज पोहोचता येणार आहे, असे वरळीचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी सांगितले.
दहा हजारांपेक्षा अधिक मतदारांसाठी सुविधा
ज्या मतदान केंद्रांवर १० हजारांपेक्षा अधिक मतदार मतदानासाठी येणार आहेत. अशा मुंबईतील सर्वच मतदान केंद्रांवर या रंगीत कार्पेटचा वापर केला जाणार आहे. मुंबईतील वरळी या मतदार संघातील ८ ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर
१० हजारांपेक्षा अधिक मतदार मतदानासाठी येणार आहेत. या ठिकाणी या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. काही मतदान केंद्रांवर
१० हजार तर काही मतदान केंद्रांवर १७ हजार मतदार आपला हक्क बजावण्यासाठी येणार आहेत, असेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.