Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते बंडखोर उमेदवारांना शांत करण्यासाठी सगळी ताकद पणाला लावताना पाहायला मिळत आहेत. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचारसभांचे नियोजन केले जात आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळी राज्यभर प्रचार करणार आहेत. भाजपाने केंद्रीय नेतृत्वांपासून ते राज्यातील पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच प्रचारसभांचे नियोजन केल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मोठी सभा मुंबईत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रातील अनेक नेते, मंत्री राज्यात प्रचारासाठी येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शाह आणि अन्य मंडळी केवळ भाजपा नव्हे, तर महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करणार आहेत. महाराष्ट्रात सरकार यापुढेही कायम राहावे, यासाठी महायुतीसमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान असणार आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर महाराष्ट्रात सत्तापालट निश्चित असल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. तर महायुतीचे नेतेही कंबर कसून तयारीला लागले आहेत.
नरेंद्र मोदींची ही सभा मुंबईतील मतदारसंघ आणि महायुतीसाठी होत आहे
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक सभा महाराष्ट्रात होणार आहेत. ०८ नोव्हेंबरला धुळे, नाशिक, ०९ नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, १३ नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि १४ नोव्हेंबर रोजी संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या सभा होणार असल्याचे समजते. मुंबईत होणाऱ्या सभेबाबत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, नरेंद्र मोदी देशातील लोकप्रिय नेते आहेत. त्यांची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. त्यांची सभा मोठे आकर्षण असते आता जे पोषक वातावरण आहे, ते महायुतीसाठी दिसते आहे. नरेंद्र मोदींची ही सभा मुंबईतील मतदारसंघ आणि महायुतीसाठी होत आहे, फक्त माहीम या एकाच मतदारसंघासाठी नाही. आता राज ठाकरे यांनी या सभेला उपस्थित राहावे की नाही, या त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही सभा मुंबईकरांसाठी आहे. जो मुंबईकर असेल, तो या सभेला येऊ शकतो, असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, माहीम मतदारसंघावरून महायुतीत एकवाक्यता नसल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेने या मतदारसंघात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहीमधील लढत तिरंगी होणार आहे. अशावेळी भाजपाने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीवेळी शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान मोदी यांची भव्य सभा झाली होती. या सभेला महायुतीतील सर्व नेत्यांसोबत राज ठाकरे हेही उपस्थित होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या सभेला राज ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित राहतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले असल्याचे सांगितले जात आहे.