लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये चार अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांचा समावेश केला आहे. सय्यद मुझफ्फर हुसेन (मीरा-भाईंदर), माजी मंत्री अस्लम शेख (मालाड पश्चिम), माजी मंत्री अरिफ नसीम खान (चांदिवली) आणि अमीन पटेल (मुंबादेवी) यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे.
काँग्रेसने विधान परिषद आणि लोकसभेत अल्पसंख्याक समाजाला स्थान दिले नव्हते. त्यामुळे विधानसभेचे वारे वाहू लागताच अल्पसंख्याक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर, मुजफ्फर हुसेन यांची प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी तर नसीम खान यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या विशेष निमंत्रितपदी नियुक्ती करून ही नाराजी काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
अल्पसंख्याक समाजाचे प्राबल्य असणाऱ्या भागातून मविआ उमेदवारांना चांगला लीड मिळाला होता. मुंबादेवी, भायखळा, अणुशक्तीनगर, धारावी आदी विभागांमधून मविआला जास्त मते मिळाली होती. मविआमध्ये चांदिवली जागेवरून तिढा होता. मात्र, वांद्रे पूर्व जागेच्या बदल्यात ही जागा काँग्रेसने नसीम खान यांच्यासाठी मागून घेतली. गेल्या निवडणुकीत त्यांचा शिंदे सेनेचे दिलीप लाडे यांनी पराभव केला होता. २०१९ मध्ये अमीन पटेल यांनी शिवसेनेच्या पांडुरंग सकपाळ यांचा पराभव केला होता. पटेल यांना ५८,९३३ तर सकपाळ यांना ३५,२५९ मते मिळाली होती. येथील अल्पसंख्याक समाजाच्या मतांमुळेच त्यांचा विजय झाला होता. अस्लम शेख यांच्या मालाडमधून माविआला कमी मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे महायुतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या रमेश ठाकूर यांचा पराभव केला होता.