“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 10:59 PM2024-11-18T22:59:34+5:302024-11-18T22:59:46+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मतांसाठी राहुल गांधी महाराष्ट्रभर फिरले, पण अजून अयोध्येला जाऊन श्रीरामांचे दर्शन घेतले नाही, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 madhya pradesh cm dr mohan yadav campaign rally in mumbai sion koliwada and slams congress and rahul gandhi | “काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका

“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सोमवारी मुंबईतील सायन कोळीवाडा येथील विधानसभेत महायुतीचे उमेदवार कॅप्टन तामिळ सेल्वन यांच्या समर्थनार्थ रोड शो आणि जाहीर सभेला संबोधित केले. मुंबईतील जनतेने मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या जाहीर सभेला मोठी उपस्थिती दर्शवली.

आपल्या संबोधनात काँग्रेस सरकारवर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस हे बुडते जहाज आहे. माझे अनेक मित्र चुकून काँग्रेसमध्ये गेले. पण आता आपण चुकलो आहोत, याची जाणीव त्यांना झालेली आहे. भगवान श्रीरामाच्या बाबतीतही काँग्रेसचे सर्व पितळ उघडे पडले आहे. सनातनला विरोध हे काँग्रेसचे चारित्र्य राहिलेले आहे. या काँग्रेसवाल्यांसाठी आम्ही एकच नारा देतो, तो म्हणजे ‘जो राम के नहीं, वो काम के नहीं’, असा खोचक टोला मुख्यमंत्री यादव यांनी लगावला.

राहुल गांधी महाराष्ट्रभर फिरत आहेत, पण अयोध्येला गेले नाहीत

काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी निशाणा साधला. राहुल गांधी महाराष्ट्रात फिरत आहेत, जे आजपर्यंत अयोध्येला रामाचे दर्शन घेण्यासाठीही गेले नाहीत. भगवान श्रीरामांबद्दल मनात एवढा द्वेष का आहे, याचे उत्तर काँग्रेसला द्यावे लागेल. मतांच्या राजकारणासाठी आमच्या देवतांचा आदर करत नाहीत, ते कुणाचेच होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सुनावले. 

काँग्रेसचे कुटुंबाला प्राधान्य पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम

पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, काँग्रेससाठी कुटुंब प्रथम आहे, तर भाजपासाठी राष्ट्र प्रथम आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याचे भाग्य लाभले आहे, याचे कारण 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास', असे म्हणणारे पंतप्रधान मोदी आणि भाजापा आहे. पंतप्रधान मोदी केवळ बोलत नाहीत, तर करून दाखवतात. त्यांच्या कुटुंबात खासदार, आमदार, मंत्रीही नाही, मात्र देशसेवेच्या कार्यातून ते जनतेपर्यंत पोहोचले आहेत, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी काढले.

भाजपा सर्व राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे

भाजपा सरकारमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिराचा संकल्प पूर्ण झाला, आता मथुरेत कृष्ण मंदिर बांधायचे आहे. आपली संस्कृती आणि देशाच्या स्वाभिमानासाठी एकत्र येऊया, असे आवाहन करत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी जनतेला भाजपाच्या बाजूने मतदान करून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावे, असे म्हटले आहे. येथे जमलेल्या जनसमुदायाचा उत्साह हा महाराष्ट्राच्या विकासाचा प्रवास पुढे नेण्यासाठी जनतेचा आपल्यावर विश्वास असल्याचा थेट पुरावा आहे आणि महाराष्ट्रात महायुती पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होऊन सरकार स्थापन होईल, असा विश्वास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी व्यक्त केला.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 madhya pradesh cm dr mohan yadav campaign rally in mumbai sion koliwada and slams congress and rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.