भाजपकडून मंत्री विजयकुमार गावितांना तिकीट कापण्याचा फोन?; नंतर समोर आली वेगळीच माहिती!
By यदू जोशी | Published: October 29, 2024 11:10 AM2024-10-29T11:10:53+5:302024-10-29T11:14:25+5:30
आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे तिकीट बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली होती.
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क |
BJP Vijaykumar Gavit ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडत असून नंदुरबारमधून भाजपची उमेदवारी जाहीर झालेल्या आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना त्यांचा ए. बी. फॉर्म पक्षाकडे परत करावा, अशा आशयाचा फोन करण्यात आला होता. मात्र हा फोन प्रदेश भाजपकडून करण्यात आला नसल्याची माहिती आता समोर आली आहे.
भाजपने आपल्या पहिल्या उमेदवार यादीत ९९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. या पहिल्याच यादीत नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून राज्याचे विद्यमान आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली होती. मात्र तुमचे तिकीट बदलण्यात आले असून पक्षाचा ए. बी. फॉर्म परत करावा, असा फोन गावित यांना आला होता. परंतु प्रदेश भाजपकडून असा कोणताही फोन केला नसल्याचे स्पष्ट झाले असून हा खोडकरपणा कोणी केला, याची भाजपमध्ये चौकशी सुरू आहे.
विजयकुमार गावितांचा सहा निवडणुकांमध्ये विजय, सातव्यांदा रिंगणात
नंदुरबारच्या राजकारणात विजयकुमार गावित यांच्या परिवाराचे वर्चस्व आहे. स्वत: डॉ. विजयकुमार गावित हे सहा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. यंदा ते सातव्यांदा रिंगणात आहेत. काही अपवाद वगळता ते १९९५ पासून सातत्याने राज्य मंत्रिमंडळात आहेत. त्यांच्या कन्या डॉ. हीना गावित या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या. २०२४ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता. डॉ. गावित यांनी आधी अपक्ष, नंतर तीन टर्म राष्ट्रवादी व दोन टर्म भाजपकडून उमेदवारी केली आहे. आता देखील ते भाजपचे उमेदवार आहेत.
गावित कुटुंब आणि नंदुरबारचे राजकारण
एकाच जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतून तीन सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहेत, असा आगळावेगळा विक्रम नंदुरबार जिल्ह्यात घडत आहे आणि पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा हे तीन भाऊ रिंगणात आहेत. गावित कुटुंबाचे सदस्य असलेले हे भावंड म्हणजे डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्रकुमार गावित आणि शरद गावित. डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार मतदारसंघातून भाजपतर्फे, राजेंद्रकुमार गावित हे शहादा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आणि नवापूर मतदारसंघातून शरद गावित हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.