Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरली आहे. राज ठाकरे राज्यभर दौरा करून मनसे उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. असे असले तरी राज्याचे लक्ष माहीम मतदारसंघाकडे लागले आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहे. माहिम मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी केलेल्या टीकेला अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
माहिम मतदारसंघात मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणूक लढवत आहेत. सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका कायम ठेवली. यानंतर आता प्रचाराला सुरुवात झाली असून, तीनही उमेदवार डोअर टू डोअर प्रचार करत आहेत. पत्रकारांशी बोलताना महेश सावंत यांनी अमित ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
अमित ठाकरे बालिश, तो काहीही बोलू शकतो
अमित ठाकरे बालिश आहे. तो काहीही बोलू शकतो. त्याला राजकारणातील काही कळते का? वक्तव्ये करायला स्वातंत्र्य आहे. देशात बोलण्याला कुणाला बंदी नाही. जनता सुज्ञ आहे. जनतेसाठी कोण उपलब्ध होईल, कोण कुठे भेटेल हे जनतेने बोलावे. मी पण काहीही बोलू शकतो, अशी टीका महेश सावंत यांनी केली. यानंतर आता अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.
मी आहे बालिश... मग आता
प्रभादेवीच्या जाहीर सभेत केलेल्या भाषणात कोणावरही टीका केली नव्हती. मी माझे व्हिजन समोर मांडले होते. लोक ठरवतील मला अनुभव आहे की नाही. मी आहे बालिश... मग आता, या शब्दांत अमित ठाकरेंनी पलटवार केला. तसेच मूळ मुद्दे लोकांकडून येतात. माझे व्हिजन असेल. माझ्या पिढीने किंवा मुलांनी जे अनुभवले नाही ते देण्याचे काम करणार आहे. पाण्याच्या प्रश्नासह इतर मुद्द्यांवर काम करणार असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अमितच्या विरोधात जे उभे आहेत, त्यांची सगळी अंडी-पिल्ली बाहेर काढू शकतो. मला त्या घाणीत हात घालायचा नाही. अमित राज ठाकरे असे नाव असले तरीही त्याला भेटायला तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही. मी सगळ्या उमेदवारांना सांगितले आहे की, तुम्ही तुमचा एक मोबाईल क्रमांक जनतेसाठी दिलाच पाहिजे तिथे तुम्ही किंवा तुमचा माणूस लोकांसाठी उपलब्ध असलाच पाहिजे. विधानसभेत चांगली माणसे पाठवायची हे माझे स्वप्न आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.