Join us

“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:56 AM

Amit Raj Thackeray Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आता गद्दार, खोके असे म्हणत फिरत आहेत. आमचे सहा नगरसेवक फोडले, त्यावेळी स्वतः केलेली चूक दिसत नाही का, असा सवाल अमित ठाकरेंनी केला.

Amit Raj Thackeray Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024:राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र यावेत, असे जे सातत्याने बोलले जाते. ते मला मुळीच वाटत नाही. माझ्या डोक्यातून ते निघून गेले आहे. २०१७ मध्ये असे वाटत होते. सन २०१४ मध्येही वाटले होते. २०१९ मध्येही ठाकरे बंधू एकत्र यावेत, यासाठी काही प्रयत्न झाले. आता माझ्या डोक्यातून तो विषय संपला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अजिबात एकत्र येऊ नये. कारण पक्षनिष्ठा हा विषय महत्त्वाचा असतो, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

माहीम मतदारसंघातून मनसे पक्षाकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, असा सूर भाजपामधून उमटत आहे. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी सदा सरवणकर माघार घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सदा सरवणकर यांनी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप तरी सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे आता अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत नेमके काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. यातच अमित ठाकरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.

जे खोके खोके करत आहेत त्यांना स्वतः केलेली चूक दिसत नाही का?

मी आजारी असताना आमचे सहा नगरसेवक फोडले. सातव्या नगरसेवकाला ऑफर होती. त्यांनी आम्हाला फोन करुन सांगितले. आता ४० आमदार फुटल्यानंतर जे खोके खोके करत आहेत त्यांना त्यावेळी स्वतः केलेली चूक दिसत नाही का? माझ्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा विषय संपला आहे. तेजस माझ्यापेक्षा खूप लहान आहे, त्यामुळे त्याच्याशी ही चर्चा करण्यात काही अर्थ नाही, तशी काही चर्चा होत नाही. आदित्यही माझ्यापेक्षा लहान आहे. पण तो राजकारणात आहे. आता गद्दार, खोके असे म्हणत फिरत आहेत. मात्र तेव्हा माझ्या आजारपणाचा काळ होता. राज ठाकरे तेव्हा उद्धव ठाकरेंच्या एका कार्यक्रमाला गेले होते. त्यानंतर आठवड्याभरातच सहा नगरसेवक फोडले. मला तो सगळा प्रकार माहिती आहे, असे सांगत अमित ठाकरे यांनी तत्कालीन परिस्थितीवर आक्रमक शब्दांत भाष्य केले.

दरम्यान, माहीममध्ये लोकांना बदल हवा आहे. अतिआत्मविश्वास म्हणून सांगत नाही पण मला ठाऊक आहे. माहीमची जनता मला निवडून देईल. मी हरलो तर काय? याचा विचार मी केलेला नाही. मी जिंकणार आहे हे खात्रीने सांगतो आहे, असे विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकमाहीमअमित ठाकरेराज ठाकरेमनसे