Join us

“राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले, अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरेंनी...”: बाळा नांदगावकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 5:18 PM

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे राज ठाकरेही संवेदनशील माणूस आहे. त्यांनी नेहमी रक्ताची नाती जपली, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

 Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सदा सरवणकर असेल किंवा बाळा नांदगावकर असेल, आम्ही जे काही आहोत, ते सगळे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहोत. कुठेतरी नाती जपायला हवीत. निवडणुका येतील आणि जातील. कुणीतरी जिंकतो आणि कुणीतरी हरतो. परंतु, ज्या परिवाराने आपल्याला नाव दिले, सगळे दिले, त्यामुळे ते जपणे महत्त्वाचे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. 

बाळासाहेब ठाकरे कठोर भाषा बोलत होते, तरी ते मनाने खूप हळवे होते. तसेच राज ठाकरे आहेत. राज ठाकरे मनाने फार संवेदनशील आहेत. राज ठाकरे यांनी रक्ताची नाती नेहमी जपली. आमची ४० हजार मते असूनही आदित्य ठाकरे जेव्हा वरळीत पहिल्यांदा उभे राहिले, तेव्हा उमेदवार दिला नाही. ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणुकीला पहिल्यांदा उभा राहतोय म्हटल्यावर राज ठाकरे यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. 

माहीमची उमेदवारी सर्वांत आधी आम्ही जाहीर केली

अमित ठाकरे निवडणूक लढवणार हेही निश्चित नव्हते. पक्षाच्या एका बैठकीत याबाबत निर्णय झाला. मतदारसंघाची चाचपणी सुरू होती. अखेर माहीम मतदारसंघ ठरला. माहीम मतदारसंघातून सर्वांत आधी आम्ही अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडे आणि ठाकरे गटाकडे विचार करण्यास वेळ होता. परंतु, दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले. अजूनही वेळ गेलेली नाही, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीनही उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. तसेच आरोप-प्रत्यारोपही होताना पाहायला मिळत आहेत. माहीम मतदारसंघात कोण बाजी मारणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४बाळा नांदगावकरराज ठाकरेउद्धव ठाकरेअमित ठाकरेआदित्य ठाकरेआदित्य ठाकरे