Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबातील तरुण मुले राजकारणात उतरत आहेत, याचा फारच आनंद आहे. आदित्य जेव्हा राजकारणात येत होते, तेव्हा सर्वांत जास्त आनंद हा राज ठाकरेंना झाला होता. राज ठाकरेंनी त्यावेळी निर्णय घेतला होता की माझ्या कुटुंबातील माणूस जर राजकारणात येत असेल तर त्याला माझा पाठिंबा असेल. त्यामुळेच राज ठाकरे यांनी तिथे उमेदवार दिला नव्हता. राज ठाकरे हे नावाने नाही तर मनाने राजा आहे, अशी आठवण मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एकूणच राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. यातच मनसेकडून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती. यानंतर आता अमित ठाकरेमाहीम मतदारसंघातून आपले नशीब आजमावणार आहेत. अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने सदा सरवणकर आणि ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहीम मतदारसंघातील ही निवडणूक चुरशीची होणार आहे. यातच बाळा नांदगावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
माहीम मतदारसंघांबाबत काय करायचे ते सर्वस्वी उद्धव ठाकरे यांचा निर्णय
दादर माहीम मतदारसंघांबाबत काय करायचे हा सर्वस्वी मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे. त्यात आम्ही काहीही बोलणार नाही. आदित्य ठाकरे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या विरोधात संदीप देशपांडे आहेत. कोणत्याही उमेदवाराला शुभेच्छा देणे चुकीचे नाही. राजकारण ही एक संस्कृती आहे. टीका ही सभागृहात होत असते, त्याबाहेर संस्कृती जपायला पाहिजे, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी दिला होता. परंतु, आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. मनसेकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी उमेदवार घोषित केले जात आहेत. मनसेकडून पहिल्यांदा ७ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मनसेकडून ४५ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यानंतर मनसेने १३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. आतापर्यंत मनसेकडून ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.