“सरवणकरांचा पाठिंबा मागितला कुणी? गजाननाची सेवा करा, तरुणांना संधी द्या”; मनसे नेत्याचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 01:56 PM2024-11-04T13:56:46+5:302024-11-04T14:00:02+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उमेदवारी मागे घेण्याबाबत आम्ही कधीही सदा सरवणकर यांना म्हणालो नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनौपचारिक विनंतीही कधी केली नाही. सदा सरवणकर यांच्यावर कुणी दबाव टाकलाय, स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी सदा सरवणकर हे सर्व वक्तव्य करत आहेत. तुम्ही लढू नका, असे आम्ही त्यांना कधीही सांगितले नाही. आम्ही लढणार हे निश्चित आहे, अशी ठाम प्रतिक्रिया मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिली.
माहीम विधानसभा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. मनसेने महायुती विरोधात दिलेले उमेदवार मागे घ्यावेत. मी जी निवडणूक लढवतो आहे ती वैयक्तिक नाही. माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना विचारून आणि मतदारसंघातील भावना समजून घेऊन मला निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे की, मी ठेवलेली अट मनसेने मान्य केली तर त्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी बोलण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी चर्चा करुन निर्णय घेणार आहे, अशी भूमिका सदा सरवणकर यांनी स्पष्ट केली. यावर प्रकाश महाजन यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याच्या भूमिकेबाबत भाजपाचे जाहीर आभार
दादरमधील बॅनरबाजी सदा सरवणकरही करत असतील. अमित ठाकरे दादरकर नाहीत का, आम्ही लढणार हे निश्चित आहे. लढाई ही लढाई असते, छोटी-मोठी, टफ फाइट वगैरे काही नाही. भाजपा महायुतीचा एक भाग आहे. अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका भाजपाने घेतली असेल, तर त्यांचे जाहीर आभार मानतो. माहीममध्ये पुढे चांगले काम व्हावे, यासाठी भाजपाने अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला असेल, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सदा सरवणकर यांचे दोन्ही पाय केळ्याच्या सालीवर आहेत. १५ वर्ष ते नगरसेवक होते, १५ वर्ष आमदार होते. आता सिद्धिविनायकाचे अध्यक्षपद दिले आहे. गजाननाची सेवा करावी आणि तरुण पिढीला वाव द्यावा. अमित ठाकरे हे बाकी सगळ्यांप्रमाणे एक मनसैनिक आहेत. त्यांना इतरांप्रमाणे समान वागणूक दिली जाते, असे प्रकाश महाजन यांनी नमूद केले.