लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध युक्त्या लढवण्यास सुरुवात केली असली तरी अद्याप प्रचाराला रंग चढलेला दिसत नाही. मुंबईतील दिग्गज उमेदवारांचाही प्रचार अजून थंडच आहे. जे उमेदवार मतदारांपर्यंत जात आहेत त्यांच्या मागेही फारसे कार्यकर्ते दिसत नाहीत. प्रचारासाठी हाती केवळ आठवडाभर उरला असतानाचे मुंबईतील हे चित्र आहे.
दादर, माहीम, लालबाग - भायखळा, शिवडी आणि वरळी या मतदारसंघांमध्ये प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या निघत आहेत. त्यांच्या मागेपुढे शेकडो कार्यकर्ते घोषणा देत आणि मतदारांना मतदानाचे आवाहन करत फिर असल्याचे आढळते. मात्र, मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरही पहिल्या आठवड्यात मध्य मुंबईत प्रचाराने जोर पकडला नव्हता.
अनेक उमेदवारांच्या प्रचारात आक्रमकताही जाणवत नाही. आपल्या वसाहतीत, गल्लीत आणि घरापर्यंत आलेल्या उमेदवाराला मतदारराजा माफक प्रतिसाद देत असल्याचे आढळते.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरचा पहिला आठवडा अत्यंत शांततेत गेला. पण दुसऱ्या आठवड्यातही नागरिकांमध्ये निवडणुकीबद्दल फारसा उत्साह नसल्याचे दिसून येते. नाक्या-नाक्यावर अथवा चहाच्या टपऱ्याही शांत आहेत. तेथे अजून निवडणूक गप्पांना तोंड फुटलेले दिसत नाही.
आजपासून धुमधडाकानागरिकांना मत देण्याची विनंती करणारे उमेदवारांचे मोठमोठे बॅनर्स, फलक, पक्षांचे झेंडे लागल्याचे चित्र अद्याप फारसे दिसत नाही. याबाबत एक ज्येष्ठ मतदार नवनाथ चव्हाण म्हणाले, “नागरिक दिवाळीत मग्न होते. दिवाळीच्या वातावरणातून अद्याप नागरिक बाहेर पडलेले नाहीत. मात्र, रविवारची सुट्टी साधून उमेदवार जास्तीतजास्त मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. पुढचा आठवडाभर प्रचार रंगेल, उमेदवार, पक्षनेते परस्परांवर आरोपांच्या फैरी झाडतील, मतदारांचे लक्ष खेचण्याचे प्रयत्न करतील.”