IPS Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी सातत्याने विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात येत होती. त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फसणाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. दुसरीकडे रश्मी शुक्ला यांच्या बदलीवरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेल्या टीकेवर आता भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात काँग्रेसने तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. अशातच निवडणुकीच्या फायद्यासाठी राज्य सरकराने रश्मी शुक्ला यांना आणलं होतं. मात्र रश्मी शुक्ला भाजपचं काम करत होत्या असा आरोप नाना पटोले यांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी पुरावे द्या नाहीतर निवडणूक आयोगाकडे तक्रार करु असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणुकीच्या फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदावर बसवलं होतं. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने त्या तक्रारीची दखल घेतली. पण इतका वेळ का लागला हा प्रश्न अनुत्तरीत आहे. भाजपसाठी सरळपणे काम करणाऱ्या या अधिकारी होत्या हे स्पष्ट होत आहे. त्यांना कुठल्याही निवडणुकीच्या संदर्भातील पदावर बसवू नका ही निवडणूक आयोगाला विनंती आहे," असं नाना पटोले यांनी म्हटलं.
"असे बेछूट आरोप करण्याआधी नाना पटोलेंना पुरावे द्यावे लागतील. हा आरोप करताना त्यांच्याकडे पुरावे नसतील तर त्यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार आहे. हा भाजपचा बदनामीचा प्रयत्न आहे. रश्मी शुक्ला त्यांची बाजू मांडतील. पण देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतलं असेल तर त्यांनी सात दिवसांत पुरावे अशी नोटीस आम्ही त्यांना आज पाठवणार आहे. अन्यथा नाना पटोले यांच्यावर निवडणूक आयोगाकडे बेछूट, बिनापुरावे आरोप केल्याची तक्रार करत कारवाईची मागणी करु," असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी आरोप केला होता की रश्मी शुक्ला यांनी पुन्हा विरोधी नेत्यांच्या फोन टॅपिंगचे आदेश दिले आहेत. म्हणून, त्यांना पदावरुन काढून टाकले पाहिजे. आता निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांनी प्रतिनियुक्तीवर सशस्त्र सीमा बल विभागात पाठवले आहे.शुक्ला यांना महायुती सरकारने दोन वर्षांची बढती दिली होती. गेल्या आठवड्यात, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली होती आणि रश्मी शुक्ला यांना ते थांबवण्यास सांगितले होते. यानंतरही, जेव्हा विरोधकांनी रश्मी शुक्लाच्या तक्रारी केल्या तेव्हा निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.