Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत माझ्याबद्दल गैरसमज होता की, नवाब मलिक माघार घेणार आहेत. मला अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. स्वतःसाठी निवडणूक लढत नाही, लोकांच्या आग्रह आणि जनतेच्या मागणीनुसार निवडणूक लढत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
शंभर टक्के मी इथून निवडून येणार आहे. नवाब मलिक आणि संघर्ष नाते कधी संपतच नाही. इथे लोक त्रस्त आहे. शिक्षणाची व्यवस्था नाही, मेडिकलची व्यवस्था नाही, कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडचा मोठी प्रश्न आहे, असे नवाब मलिकांनी म्हटले आहे. तसेच निवडणूक निकालानंतर काय परिस्थिती निर्माण होईल. कोण कुठे जाईल आता कोणाला सांगता येत नाही, असे सूतोवाच नवाब मलिकांनी केले.
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?
राज्यात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, अजितदादा पवार ठरवतील कोणाला मुख्यमंत्री करायचे आहे. निश्चित रूपाने दादा किंगमेकर होणार आहेत. इथे पक्ष विजयी होणार नाही, जनता विजयी होईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. परिस्थिती बदलत राहते. शत्रू मित्र होतात, मित्र शत्रू होतात. २०२४ च्या निकालानंतरची परिस्थिती काय असेल सांगता येत नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अजित पवारांनी मलिकांना तिकीट द्यायला नको होते, असे महाराष्ट्रातील अनेकांना वाटते. त्यांच्यावरील आरोप गंभीर आणि आरोपपत्र गंभीर स्वरुपाचे आहे. महाराष्ट्र हे कधीही स्वीकारू शकत नाही. भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप अशा लोकांसाठी कधीच प्रचार करणार नाही, असे भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटले होते. यावर, मी कुठे सांगतोय माझा प्रचार करा, मला पाठिंबा द्या, अशा शब्दांत सुनावले. मला त्यांचा विरोध असणार हे मला अपेक्षितच आहे, असे नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिले होते.