Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जागावाटप आणि उमेदवारीवरून महायुती तसेच महाविकास आघाडीत सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत कुरबुरी कमी असल्याचे दाखवले गेले असले, तरी खटके उडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंडखोरीही मोठ्या प्रमाणात झाली. नवाब मलिकांच्या उमेदवारीवरून महायुतीत नाराजी असल्याचे दिसून आले.
महायुती सरकारमध्ये अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट सहभागी झाल्यापासून नवाब मलिकांवरून महायुतीत खटके उडत असल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला अगदी नवाब मलिक विधानसभेत अजित पवार गटाच्या बाकांवर येऊन बसल्यापासून ते नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर करेपर्यंत भाजपाने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली. तर विरोधी महाविकास आघाडीने हाच धागा पकडत भाजपावर हल्लाबोल केला. तसेच अजित पवार गट आणि भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्नही केला. भाजपाचा विरोध आणि राजकीय वर्तुळातील दबाव झुगारत अजित पवार गटाने नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर केली. यावर आम्ही मलिकांचा प्रचार करणार नाही, असे भाजपाने स्पष्टपणे सांगून टाकले. यानंतर आता अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यावर नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले आहेत.
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का?
नवाब मलिकांना दिलेली उमेदवारी आणि होणारा प्रचार, याबाबत अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत रोखठोकपणे उत्तर दिले. आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना आम्ही घड्याळ हे चिन्हही दिलेले आहे. आम्ही त्यांच्या रॅलीमध्ये जाणारच ना. नवाब मलिक यांच्यावर आतापर्यंत फक्त आरोप झाले आहेत. तसेच आरोप सिद्ध झाल्याशिवाय दोषी कसे ठरवता? अशी विचारणा अजित पवार यांनी केली.
जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस
नवाब मलिक यांची कन्या सना मलिक या अणुशक्तीनगर या मतदारसंघातून यावेळची विधानसभा निवडणूक लढवत आहेत. तर नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द या जागेवरून अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. अजित पवार प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार हा मर्द माणूस आहेत. ते जो शब्द देतात तो शब्द दादा पाळतात. आमच्या कठीण काळात पाठीशी ते उभे राहिले आणि आम्हाला उमेदवारी दिली. महायुती आणि महाविकास आघाडी माझ्या विरोधात आहे. मात्र, जनता माझ्यासोबत आहे, असे नवाब मलिक म्हणालेत.