निवडणूक आयोगाला सापडतेय पैशांचे घबाड! मुंबईतून सर्वाधिक १८३ कोटी, राज्यात ४९३ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:11 PM2024-11-12T13:11:58+5:302024-11-12T13:12:17+5:30
राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून, या कालावधीत बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ व मौल्यवान धातूच्या वाहतुकीवर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष आहे. यामुळे राज्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ व मौल्यवान धातू यांचा समावेश आहे.
कारवाईसाठी आयोगाने राज्यभरात ठिकठिकाणी नाके उभारले असून, राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही माहिती देताना राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्वाधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, त्याखालोखाल मुंबई शहराचा क्रमांक लागतो. मुंबई उपनगरातून १३८ कोटी १९ लाखांची तर मुंबई शहरातून ४४ कोटी ९५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
नागरिक जागे; आल्या तब्बल ४ हजार तक्रारी
विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत राज्यभरात सी-व्हिजील ॲपवर एकूण ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजील ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत थेट तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येते.
पैशांची पेटीच जप्त; ७५ लाखांची रोकड पकडली
यवतमाळ : येथील तहसील चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका ऑटोतून रोख नेली जात असल्याची माहिती मिळाली. सोमवारी सायंकाळी हा रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतला. झडती घेतली असता लोखंडाच्या पेटीमधून ७५ लाखांची रोख नेली जात होती. यावेळी ऑटोत सुरेश निमजे, तुळशीदास खेकडे, आशिष जोग हे होते. तिघांनी ही रक्कम अकोला अर्बन बँक शाखा, जाजू चौक परिसर येथील असल्याचे सांगितले. रकमेबाबतची सर्व कागदपत्र सोबत होती. मात्र, ज्या रिक्षातून रोख नेली जात होती, ती निवडणूक आयोगाच्या ॲपवर नोंदणीकृत नव्हती. यामुळे भरारी पथकाने ही रोख रक्कम जप्त केली. बँकेचे नोंदणीकृत वाहन ऐनवेळी बिघडल्याने रिक्षामधून रोख नेली जात होती.