Join us

राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 5:51 PM

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नागपूर येथे ‘संविधान सन्मान संमेलन’ आणि मुंबईत ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ घेऊन विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसमहाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी ५ वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार असून या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.

मीडियाशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, BKCमधील सभेला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत, असे अतुल लोंढे यांनी सांगितले.

या सभेत काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर केल्या जाणार आहेत

या सभेत काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर केल्या जाणार आहेत. काँग्रेस पक्ष या गॅरंटी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचवणार असून महायुतीच्या भ्रष्ट कराभाराबाबत जनजागृती करणार आहे. एकनाथ शिंदे-भाजपा-अजित पवार युती सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे, तो मविआ परत आणेल. तसेच भाजपाच्या फेक नेरेटिव्हलाही चोख उत्तर दिले जाईल. काँग्रेसने कर्नाटक विधानसभेपासून गॅरंटी जाहीर केल्या असून ज्या जाहीर केल्या त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरु आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने कोणत्या गॅरंटी जाहीर केल्या व त्याची अंमलबजावणी कशी सुरु आहे हे वर्तमानपत्रात जाहिरात देऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपाच्या फेक नॅरेटिव्हला राज्यातील जनता बळी पडणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४काँग्रेसराहुल गांधीमहाराष्ट्र विकास आघाडीमहाविकास आघाडी