Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:26 PM2024-11-15T12:26:35+5:302024-11-15T12:30:08+5:30
Raj Thackeray- Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: इतरांनी केवळ काय करू एवढेच सांगितले आहे. परंतु, आम्ही काय करू यासोबतच ते कसे करू हेही सांगितले आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक लढवणाऱ्या बहुतांश पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करून अनेक आश्वासनांची खैरात दिली आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. मराठी अस्मिता, गड-किल्ले संवर्धन यांपासून ते इंटरनेट, औद्योगिक क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रांतील गोष्टी कशा सोडवू शकतो, याची सविस्तर माहिती देताना काही उपायही दिले आहेत.
‘आम्ही हे करू’ या यावाने राज ठाकरे यांनी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू इतकेच आश्वासन दिले आहे. पण, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू, इतकेच दिलेले नाही, तर ते कसे करू यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १९ वर्ष झाली आहेत. या कालावधीत मनसेने काय केले? त्याची माहिती दिली आहे, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे.
२००६ मध्ये राज्याची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईन सांगितले होते. ती २०१४ ला आणली. परंतु, या काळात मला हिणवले. कुत्सितपणे प्रश्न विचारले गेले. त्यावेळी युती तुटली होती. पण गेल्या दहा वर्षात ब्ल्यू प्रिंटमध्ये काय आहे, कशी केली वगैरे कुणी मला विचारले नाही. आमच्या जाहीरनाम्यामध्ये ब्ल्यू प्रिंटच्या अनेक गोष्टी आणलेल्या आहेत याचे कारण विषय बदलले नाहीत, प्रश्न बदललेले नाहीत, ते अद्यापही तसेच आहेत. आपण त्याच प्रश्नांवर चर्चा करत आहोत. हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
‘आम्ही हे करू’... मनसेच्या जाहीरनाम्यात नेमके काय आहे?
- जाहीरनाम्यात पहिल्या भागात, मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टी आहेत. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे.
- दुसऱ्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे.
- तिसरा विभाग, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे.
- चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे.
- या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपाय दिले आहेत. आम्ही डिटेल्समध्ये काम केले आहे, ते पाहा, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.