Join us

“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 4:17 PM

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक माणसांशी माझा जुना संबंध आहे. ते घरी येत होते, भेटी-गाठी होत होत्या, असे सांगत राज ठाकरे यांनी आपली भूमिका सांगितली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा मनसे पक्ष संपूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी मनसे पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. परंतु, सर्वांत मोठी लक्षवेधी लढत ठरेल ती माहीम मतदारसंघात. कारण या ठिकाणी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरेंसमोर शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांचे आणि ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचे आव्हान असणार आहे. यातच या निवडणूक निकालानंतर मनसे सत्तेत दिसेल आणि आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल, असे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत.

या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार की महायुतीसोबत जाणार, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. काम महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडी निश्चित नाही. शिवसेनेत होतो, तेव्हापासून दुसरा कोणता पक्ष माझ्या आयुष्यात आला असेल, तर तो म्हणजे भाजपा आहे. प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, नितीन गडकरी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण आडवाणी असतील, यांचे घरी येणे जाणे होते, यांच्याशीच माझा संबंध आला. माझा कधीही काँग्रेस, एनसीपी यांच्याशी कधीही संबंध आलाच नाही. गाठी-भेटी हा भाग निराळा आहे. परंतु, भाजपाप्रमाणे कधी अन्य संबंध आला नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक माणसांशी माझा जुना संबंध आहे. ते घरी येत होते, भेटी-गाठी होत होत्या. यंदाच्या निवडणुकीत मनसे सत्तेत असेल. सोपे नाही ते. मला वाटतेय, त्याप्रमाणे भाजपाचा मुख्यमंत्री होईल. आमच्या साथीने होईल, असे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांनी दिले. तसेच नेत्यांची बैठक झाली, अमित म्हणाला की, पक्षाने सांगितले तर प्रत्येकाने लढावे, मी सुद्धा लढेन. त्यावर मी अमितला म्हणालो की, तू सिरियस आहेस, आधी भांडुप बद्दल चर्चा झाली. निवडणूक लढणे हे माझे टेम्परामेंट नाही. मी बाळासाहेबांच्या विचाराने वाढलो, अमितला कसे समजावयचे याचा मी विचार करत होतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय, अमित विरोधात माहीममध्ये उमेदवार देणे हा, हा प्रत्येकाचा स्वभावाचा भाग झाला आहे. प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते, सगळ्यांनाच हे कळेल असे नाही. बाकी प्रत्येकाचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपण कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार, असा सवाल राज ठाकरेंनी केला. ते एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलत होते.

दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा शक्य असूनही आमदार फोडले नाहीत. मग मला सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. मला अशाप्रकारे फोडाफोडी करुन कधीही सत्ता नको. लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाची जागा मनसेने मागितली होती. या दोन्ही जागांवरुन शिंदे गटाचे उमेदवार निवडून येणार नाहीत, असे आम्ही तेव्हाच सांगितले होते. या दोन्ही जागा निवडून आणणे तुमच्या हातातील गोष्ट नाही, या जागा तुम्हाला लागणार नाहीत, असे आम्ही सांगितले होते. या दोन्ही जागा मनसेला लढवू द्या. आम्ही त्या जागा १०० टक्के जिंकल्या असत्या. पण त्यावेळी शिंदे गटाकडून मनसेच्या उमेदवारांनी आमच्या चिन्हावर लढावे, असे सांगितले. निवडणूक आमच्या निशाणीवर लढली गेली पाहिजे. त्यावर मी सांगितले की, अहो आमच्या पक्षाची निशाणी कमावलेली आहे, ती ढापलेली नाही. आमची निशाणी ही निवडणुकीच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात मिळाली आहे. लोकांच्या मतदानामुळे ही निशाणी आम्हाला मिळाली, ती कोर्टातून आलेली नाही, अशी टोलेबाजी राज ठाकरे यांनी केली.  

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४राज ठाकरेमनसेभाजपामहायुती