राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 06:09 AM2024-10-24T06:09:29+5:302024-10-24T06:10:08+5:30
दादर, प्रभादेवी भागात तिन्ही पक्षांचे वर्चस्व असल्याने येथील मतविभागणी कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्धवसेनेने माहीम येथून विभागप्रमुख महेश सावंत यांची उमेदवारी जाहीर केल्याने आता येथील निवडणूक तिरंगी होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे. दादर, प्रभादेवी भागात तिन्ही पक्षांचे वर्चस्व असल्याने येथील मतविभागणी कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभेत मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने राहुल शेवाळे यांना माहीम विधानसभेतून १३,९९० मतांचे मताधिक्य मिळाले होते. माहीम परिसरात उद्धवसेनेचे अनिल देसाई यांना लीड होता. शिंदेसेनेचे सदा सरवणकर यांच्यासाठी ही निवडणूक सोपी वाटत होती. मात्र, अमित ठाकरे मैदानात उतरल्याने मनसेसाठी ती प्रतिष्ठेची झाली आहे. सरवणकर आणि ठाकरे दादरमधील, तर सावंत हे प्रभादेवीमधील रहिवासी आहेत.
गेल्यावेळी काँग्रेस उमेदवाराला १५,२३५ मते होती. त्यामुळे काँग्रेसच्या आघाडीचा उद्धवसेनेला फायदा होईल. येथे सव्वालाख मराठी तर अल्पसंख्याकांची ३८ हजार मते आहेत. गुजराती आणि उत्तर भारतीयांची प्रत्येकी २० हजार मते आहेत.
‘कुणीही उमेदवार दिला, तरी फरक पडणार नाही’
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मला उमेदवारी देणे हा साहेबांचा कॉल होता आणि निवडून आणणे हा लोकांचा कॉल आहे. साहेब आणि जनता यांच्यावर माझा विश्वास आहे. आमचा प्रचार महायुती, महाविकास आघाडी दोघांच्याही विरोधात असेल. त्यामुळे कुणी माझ्याविरोधात उमेदवार दिला तरी मला फरक पडणार नाही, असा टोला अमित ठाकरे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना उद्धवसेनेला लगावला.
२०१९ नंतर राजकारणाचा चिखल झाला आहे. नवीन कोणाला राजकारणात यायचे असेल त्यांच्यापुढे हे राजकारण न्यायचे नाही. हे कुठे तरी थांबायला हवे. माझ्या राजकारणाची व्याख्या समाजकारण आहे. सत्तेत आल्यानंतर लोकांची कामे करायला हवीत, असे ते म्हणाले. माझे दरवाजे नेहमी महाराष्ट्रासाठी उघडे असतात. त्यामुळे येथील समस्या माहिती आहेत, लोकांचे प्रश्न तोंडपाठ आहेत. पक्षाला गरज होती त्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
२०१९ विधानसभा निवडणूक (मते)
- सदा सरवणकर (शिंदेसेना) ६१,३३७
- संदीप देशपांडे (मनसे) ४२,६९०
- प्रवीण नाईक (काँग्रेस) १५,२४६
२०२४ लोकसभा (माहीम - मते)
- राहुल शेवाळे (शिंदेसेना) ६९,४८८
- अनिल देसाई (उद्धवसेना) ५५,४९८
माहीम भागातील मते निर्णायक ठरणार
माहीम विधानसभेत दादर, प्रभादेवी आणि माहीम या भागांचा समावेश आहे. माहीम भागात अल्पसंख्याक समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहे. लोकसभा निवडणुकीत अनिल देसाई यांना येथे चांगले मतदान झाले होते. त्यातून त्यांची पिछाडी काही प्रमाणात भरून निघाली होती.